देशातील दुर्लक्षित घटकांच्या सुरक्षेसाठी काँग्रेस कटीबद्ध : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 10:27 AM2019-06-08T10:27:23+5:302019-06-08T10:35:08+5:30
राहुल यांनी वायनाड लोकसभा मतदार संघातून तब्बल ४.३१ लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला. परंतु, काँग्रेसचा गड समजला जाणाऱ्या अमेठी मतदार संघातून राहुल यांचा पराभव झाला आहे. अमेठीतून स्मृती इराणी यांनी विजय मिळवला.
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी वायनाड मतदार संघातील मतदारांचे आभार मानले. तुम्ही सर्वांनी मला प्रचंड बहुमताने निवडून दिले. हा विजय अद्वितीय होता. यावेळी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला. विद्यमान सरकार देशात द्वेष पसरवत आहे. परंतु, देशातील कमजोर वर्गाला मोदींच्या चुकींच्या धोरणांपासून वाचविण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे राहुल यांनी म्हटले.
मोदी सरकार देशात द्वेष पसरवत आहे. परंतु, काँग्रेसला माहित आहे, द्वेष संपविण्यासाठी केवळ प्रेमाची गरज आहे. देशातील कमजोर घटकांना वाचविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मी तुमचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी तयार असून वायनाडचा विकास करण्यासाठी सज्ज असल्याचे राहुल यांनी म्हटले. राहुल दोन दिवसाच्या वायनाड दौऱ्यावर आहेत.
राहुल यांनी वायनाड लोकसभा मतदार संघातून तब्बल ४.३१ लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला. परंतु, काँग्रेसचा गड समजला जाणाऱ्या अमेठी मतदार संघातून राहुल यांचा पराभव झाला आहे. अमेठीतून स्मृती इराणी यांनी विजय मिळवला.
राहुल वायनाड येथे पोहोचल्यानंतर हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी प्रथमच सर्वजनिक ठिकाणी उपस्थित होते. राहुल गांधी या दौऱ्यात ५२ वर्षीय शेतकरी दिनेश कुमार यांच्या घरी भेट देणार आहेत. दिनेश कुमार यांनी २३ मे रोजी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती.