‘भारत जोडो यात्रा’ मध्य प्रदेशात दाखल; कडाक्याच्या थंडीत आदिवासींनी रात्र जागून काढली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:38 PM2022-11-24T12:38:13+5:302022-11-24T12:38:19+5:30
नानासाहेब कांडलकर जळगाव जामोद (जि. बुलढाणा) : काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ बुधवारी ...
नानासाहेब कांडलकर
जळगाव जामोद (जि. बुलढाणा) : काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ बुधवारी मध्य प्रदेशात दाखल झाली. यावेळी राहुल गांधींच्या भेटीसाठी सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या भिंगारा, चाळीसटापरी व गोमाल या गावांतील आदिवासी बांधव, महिला व मुलांनी महाराष्ट्र व मध्यप्रदेशची सीमा असलेल्या तीनखुटी येथे कडाक्याच्या थंडीत संपूर्ण रात्र जागून काढली. बुधवारी सकाळी ६:३० वाजता राहुल गांधी तेथे पोहोचले, त्यावेळी सर्व आदिवासी बांधवांनी ‘भारत जोडो’चा जयजयकार करीत ‘हम भी आप के साथ है’ असा संदेश दिला.
राहुल गांधी यांनी अत्यंत नम्रपणे आदिवासी बांधवांनी दिलेला धनुष्यबाण स्वीकारत त्यांच्यासोबत संवाद साधला. आदिवासींना सन्मानाचे जीवन कसे जगता येईल यासाठी आपण प्रयत्नरत राहू, असा विश्वास राहुल गांधी यांनी आदिवासींना दिला.
‘झुकना बंद करो’
तीनखुटी येथे आदिवासी बांधवांशी संवाद साधताना दोन छोटी मुले राहुल गांधी यांच्या पाया पडत होती. त्यांना मायेने थांबवत ‘झुकना बंद करो, मेरे पैर पडने की कोई जरूरत नहीं, सन्मान से जिओ’ असा संदेश राहुल गांधी यांनी दिला.
बोदरली येथे ध्वज हस्तांतरण
सातपुडा पर्वतातील आमपाणी येथे ध्वजाराेहणानंतर ही यात्रा रवाना झाली. आमपाणी ते मध्य प्रदेशातील बोदरलीपर्यंत सुरक्षेच्या कारणावरून ही यात्रा वाहनाने गेली. बोदरलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोलेंनी मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना तिरंगा ध्वज हस्तांतरित केला .