काँग्रेसने जाहीर केले ३९ उमेदवार; राहुल गांधी वायनाडमधून, तर थरूर तिरुवनंतपुरममधून लोकसभेच्या मैदानात उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 06:20 AM2024-03-09T06:20:18+5:302024-03-09T06:21:02+5:30
राहुल गांधींशिवाय या यादीत काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
आदेश रावल
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने (सीईसी) गुरुवारी छत्तीसगड, केरळ आणि इतर राज्यांमधील ३९ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली.
राहुल गांधींशिवाय या यादीत काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
-आज जाहीर झालेल्या ३९ जागांपैकी १९ जागा २०१९ मध्ये काँग्रेसने जिंकल्या होत्या.
-या १९ पैकी १६ जागांवर विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळाली आहे.
-१ जागा राजीनाम्यामुळे रिकामी होती, तेथे नवा उमेदवार देण्यात आला आहे.
-२ जागांवर विद्यमान खासदाराचे तिकीट कापून नवे उमेदवार
दिले आहेत.
कोणत्या वयाचे आहेत उमेदवार
काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत १५ उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील असून २४ उमेदवार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजातील आहेत.
१२ उमेदवार ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. आठ उमेदवार ५० ते ६० वयोगटातील आहेत. १२ उमेदवार ६१ ते ७० वयोगटातील आहेत, तर सात उमेदवार ७१ ते ७६ वयोगटातील आहेत.
मंत्र्याविरोधात लढणार शशी थरूर
३९ उमेदवारांपैकी तीन महिलांना तिकीट देण्यात आले. महासचिव केसी वेणुगोपाल यांना केरळमधून तिकीट देण्यात आले. ते राज्यसभेचे सदस्यही आहेत. केरळमधील एकाही खासदाराचे तिकीट कापलेले नाही.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे भाऊ डी.के. सुरेश यांना पुन्हा तिकीट देण्यात आले. राष्ट्रीय संघटन सचिव वामसी रेड्डी यांना तेलंगणातून तिकीट
देण्यात आले.
रायपूरमधून तरुण चेहरा : विकास उपाध्याय यांना तिकीट दिले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला हाेता. राजेंद्र साहू यांना पहिल्यांदाच दुर्ग, छत्तीसगडमधून तिकीट मिळाले आहे.
केरळमधील सर्वाधिक जागा
-उमेदवारांच्या पहिल्या यादीत सर्वाधिक १६ उमेदवार केरळमधील आहेत. केरळमध्ये लोकसभेच्या २० पैकी १६ जागांवर काँग्रेस लढणार आहे. मित्रपक्ष चार जागांवर निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने केरळमधील आपल्या सर्व १६ विद्यमान लोकसभा सदस्यांना पुन्हा रिंगणात उतरविले आहे.
कोणत्या राज्यातील किती?
-काँग्रेसने छत्तीसगडमधील सहा,
कर्नाटकातील सात, तेलंगणातील चार, मेघालयातील दोन आणि लक्षद्वीप, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरातील प्रत्येकी एका जागेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. छत्तीसगडच्या कोरबा मतदारसंघाच्या खासदार ज्योत्स्ना महंत आणि कर्नाटकच्या बंगळुरू ग्रामीण मतदारसंघाचे विद्यमान खासदार डी. के. सुरेश यांच्यावर विश्वास व्यक्त केला.