त्या विधानावरून राहुल गांधी यांनी कमलनाथ यांना सुनावले खडेबोल, म्हणाले...
By बाळकृष्ण परब | Published: October 20, 2020 04:06 PM2020-10-20T16:06:32+5:302020-10-20T16:09:01+5:30
Rahul Gandhi News : कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्याबाबत उच्चारलेल्या आक्षेपार्ह शब्दावरून राजकारण तापले आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या या वक्तव्याबाबत प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
वायनाड - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्याबाबत उच्चारलेल्या आक्षेपार्ह शब्दावरून राजकारण तापले आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या या वक्तव्याबाबत प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी या विधानाबाबत कमलनाथ यांना खडेबोल सुनावले आहेत. कमलनाथ यांनी ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर केला ती आपल्याला अजिबात मान्य नाही. ही घटना दुर्भाग्यपूर्ण आहे, असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे.
केरळमधील वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींना पत्रकार परिषदेदरम्यान, कमलनाथ यांच्या आक्षेपार्ह विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, कमलनाथ माझ्या पक्षाचे आहेत. मात्र त्यांनी वापरलेली भाषा मला व्यक्तिगतरीत्या मान्य नाही. कुणीही असो मी अशा भाषेला अजिबात मान्य करणार नाही. कुणीही असो, अशी भाषा वापरणे चुकीचे आहे.
राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, सामान्यपणे, मला वाटते की, देशातील महिलांबाबत प्रत्येक पातळीवर आपल्या व्यवहारात सुधारणा होण्याची गरज आहे. मग कायदा आणि सुव्यवस्था असो वा आदरभाव असो. सरकार, व्यवसाय आणि कुठल्याही अन्य क्षेत्रात त्यांच्या स्थानाबाबत असो. देशातील महिला देशाचा गौरव आहे, त्याचे रक्षण झाले पाहिजे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या विधानाबाबत कमलनाथ यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ते म्हणाले की, हे राहुल गांधींचे मत आहे. त्यांना मी कोणत्या संदर्भात बोललो होतो हे समजावून सांगण्यात आले असावे. मी कोणत्याबाबती हे विधान केले होते, हे मी आधीच स्पष्ट केले आहे.मात्र या विधानाबाबत माफी मागणार का असे विचारले असता मी का माफी मागावी असा प्रतिप्रश्न कमलनाथ यांनी केला. कुणाला अपमानित करण्याचा माझा हेतू नव्हता हे मी आधीच स्पष्ट केले आहे. आता जर कुणाला अपमानित झाल्यासारखे वाटत असेल तर त्याबाबत मला खेद आहे, असे ते म्हलणाले होते.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेल्या कमलनाथ यांनी शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि डबरा विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुतील भाजपा उमेदवार असलेल्या इमरती देवी यांचे नाव न घेता आयटम असा उल्लेख केला होता. या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून, कमलनाथ यांच्यावर जोरदार टीका झाली होती.