ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपविण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 02:35 PM2019-05-27T14:35:31+5:302019-05-27T14:39:04+5:30
राज्यात पक्षातील कार्यकर्त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळेच काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याचा दावा यादव यांनी केला.
भोपाळ - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मध्य प्रदेशमधीलकाँग्रेस नेत्यांनी राज्यातील नेतृत्वावर प्रश्नचिन्हा उपस्थित करण्यासाठी सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राज्य सचिव विकास यादव यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून ज्योतिरादित्य सिंधीया यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्याची मागणी केली आहे.
राज्यात पक्षातील कार्यकर्त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळेच काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याचा दावा यादव यांनी केला. तसेच मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पद एकाच व्यक्तीकडे आहे, अशा स्थितीत कार्यकर्त्यांचं ऐकलं जात नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होते. राज्यातील शेतकरी कर्जमाफी देखील अर्धवट झाली असून त्याचा फटका पक्षाला बसला असल्याचे यादव यांचे म्हणणे आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने मध्य प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्योतिरादित्य सिंधीया यांना नियुक्त करावे, अन्यथा सर्वच पदाधिकारी राजीनामा देतील, असंही यादव यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. दुसरीकडे कमलनाथ यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री इमरती देवी यांनी देखील राज्याचं नेतृत्व सिंधीया यांच्याकडे सोपविण्याची मागणी केली आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेसला २८ पैकी केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ यांनी छिंदवाडा लोकसभा मतदार संघातून विजय मिळवला.