शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 02:36 PM2019-10-11T14:36:01+5:302019-10-11T14:44:13+5:30
काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
नवी दिल्ली - महाराष्ट्र व हरियाणा या दोन प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसवर आपल्याच नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विविध वक्तव्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचं म्हटल्यानंतर आता मध्य प्रदेशमधील शेतकरी कर्जमाफीवरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्णपणे पूर्ण झालेलं नाही असं म्हटलं आहे. 'शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ झाले पाहिजे. शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ केले गेले नाही. केवळ 50 हजार रुपयांपर्यंतचेच कर्ज माफ केले गेले आहे, मात्र आपण दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पाहिजे' असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
Jyotiraditya Scindia, Congress, in Bhind, MP: The farm loan waiver of farmers has not been done in totality. Loan of only Rs 50,000 has been waived off even when we had said that loan upto Rs 2 Lakh will be waived off. Farm loan upto Rs 2 Lakh should be waived off. (10.10.2019) pic.twitter.com/6zMW5AyDBu
— ANI (@ANI) October 11, 2019
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पक्षावरील संकट आणखी वाढले असून आमचे नेते सोडून गेले हीच पक्षासमोरील मोठी समस्या असल्याचे म्हटल्यानंतर आता काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचे म्हणत घरचा आहेर दिला आहे.
मला कोणाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया द्यायची नाही, मात्र काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे, यात कुठलीच शंका नाही, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर ज्योतिरादित्य शिंदे पक्षातील अंतर्गत मतभेदांवरून नाराज असल्याचे अनेकदा दिसून आले होते. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता.
सलमान खुर्शीद यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून पक्ष अद्याप बाहेर पडला नसल्याचे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. खुर्शीद म्हणाले होते की, आम्ही पराभवाचे एकत्रित विश्लेषण करू शकलो नाही. पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षापासून दूर गेले हे आमच्यासमोरील मोठं संकट आहे. राहुल गांधी यांच्यावर आताही पक्षाचा विश्वास आहे. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्रातही काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षातील मतभेदांबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. निवडणूक प्रचारापासून निरुपम यांनी स्वत:ला दूरच ठेवले आहे. आपली नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती. तिकडे हरयाणामध्येही चित्र असेच आहे. अनेक वर्षे सक्रियपणे काम केलेल्या अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे.