"काँग्रेस १०० पेक्षा जास्त घरे बांधणार", वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 08:14 PM2024-08-02T20:14:42+5:302024-08-02T20:33:17+5:30
Rahul Gandhi on Kerala landslides : राहुल गांधी यांनी भूस्खलनग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Kerala landslides : केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलन झाल्यामुळं ३०८ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. तसेच, भूस्खलनाच्या दुर्घटनेमुळे अद्याप शेकडो लोक बेपत्ता आहेत. या दुर्घटनेनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाडला भेट दिली असून भूस्खलनग्रस्तांशी संवाद साधला. यादरम्यान राहुल गांधी यांनी भूस्खलनग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस १०० पेक्षा जास्त घरे बांधून देणार असे राहुल गांधी यांनी सांगितले.
एएनआय या वृत्तसंस्थेशी राहुल गांधी यांनी शुक्रवारी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी म्हणाले, "मी कालपासून येथे आहे, काल घटनास्थळी जाऊन भूस्खलन घडलेल्या भागाची पाहणी केली. आम्ही शिबिरांमध्ये गेलो होतो, आम्ही तेथील परिस्थितीचं आकलन केलं. त्यानंतर प्रशासनाबरोबर बैठकही घेतली आहे. यावेळी प्रशासनाने आम्हाला या दुर्घटनेतील मृतांची संख्या आणि नुकसान झालेल्या घरांबाबत माहिती दिली. यावेळी काँग्रेसकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल."
याचबरोबर, वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस १०० पेक्षा जास्त घरे बांधून देणार असे राहुल गांधी यांनी सांगितलं. तसंच, केरळने अशी घटना याआधी कधीही पाहिली नाही किंवा मला वाटतं केरळ सारखी अशी घटना एकाही प्रदेशात पाहिली नाही. या दुर्घटनेसंदर्भात मी केरळच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहे. याशिवाय, दिल्लीतही याबाबत चर्चा करण्यात येणार आहे, असंही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.
#WATCH | Wayanad, Kerala: Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "I have been here since yesterday. This is a terrible tragedy. Today we had a meeting with the administration and panchayat. They briefed us on the number of casualties they expect, number of houses that… pic.twitter.com/LewCSTA18K
— ANI (@ANI) August 2, 2024
जवळपास ३०० लोक अद्याप बेपत्ता -एम. आर. अजित कुमार
दरम्यान, केरळच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रभारी एडीजीपी एम.आर. अजित कुमार यांनी शुक्रवारी (२ ऑगस्ट) सकाळी माहिती देताना सांगितलं की, वायनाडमधील भूस्खलन दुर्घटनेत अद्याप ३०० लोक बेपत्ता आहेत. तसंच, जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, वायनाडमधील ९१ मदत शिबिरांमध्ये ९,३२८ लोक राहत आहेत. दरम्याान, महसूल विभाग माहिती गोळा करण्यात व्यस्त आहे. अशा स्थितीत येत्या एक-दोन दिवसांत चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल.