Madhya Pradesh Election : सरकार आल्यावर घरगुती गॅस सिलिंडर 500 रुपयांना देऊ; 'या' राज्यात काँग्रेसची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 01:25 PM2023-03-20T13:25:07+5:302023-03-20T13:27:29+5:30
Madhya Pradesh Politics: विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि काँग्रेस मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडत आहेत.
Madhya Pradesh News: आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी पक्षाकडून विविध आश्वासने दिली जात आहेत. एकीकडे राज्यातील भाजप सरकार एका मागून एक योजनांचा धडाका लावत आहे, तर दुसरीकडे सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसकडूनही मोठ-मोठी आश्वासने दिली जात आहेत. यातच काँग्रसने एक मोठी घोषणा केली आहे.
काँग्रेसने जाहीर सभेत घोषणा केली
जनतेला आकर्षित करण्याच्या प्रयत्नात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी काँग्रेसच्या हाती सत्ता दिल्यास घरगुती गॅस सिलिंडर 500 रुपयांना देऊ, अशी घोषणा त्यांनी केली. रविवारी नरसिंगपूर जिल्ह्यात ही जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत कमलनाथ यांनी भाजप सरकारवरही जोरदार निशाणा साधला. शिवराज सरकारच्या धोरणांवर त्यांनी जोरदार टीका केली.
मैं वचन देता हूँ कि-
— Kamal Nath (@OfficeOfKNath) March 19, 2023
⬆️ मध्यप्रदेश में कांग्रेस सरकार बनने पर हम महिलाओं को 1500 रूपये प्रतिमाह देंगे।
⬆️ मध्यप्रदेश में कांग्रेस सरकार बनने पर गैस सिलेंडर 500 रूपये में दिया जाएगा।
आईये ! हम और आप मिलकर मध्यप्रदेश की नई तस्वीर बनायें। pic.twitter.com/9hbPiQnxXg
भाजप आणि काँग्रेसमध्ये आश्वासनांची स्पर्धा
विशेष म्हणजे शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्यासाठी लाडली बहना योजना सुरू केली आहे. अशा स्थितीत काँग्रेस मागे कशी राहील? आता कमलनाथ यांनी आश्वासन दिले की, राज्यात काँग्रेसचे सरकार येताच महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जातील.
यामुळे महिला मतदार महत्वाच्या
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये 2,60,23,733 महिला मतदार नोंदणीकृत आहेत. राज्यातील एकूण 230 विधानसभा जागांपैकी 18 मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. यामध्ये आदिवासीबहुल बालाघाट, मांडला, दिंडोरी, अलीराजपूर आणि झाबुआ जिल्ह्यांचा समावेश आहे. नवीन महिला मतदारांच्या संख्येत 2.79 टक्के वाढ झाली आहे, तर पुरुष मतदारांची संख्या 2.30 टक्के आहे. अंदाजानुसार, 13.39 लाख नवीन मतदारांपैकी 7.07 लाख महिला आहेत.