गोडसे समर्थकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; दिग्विजय सिंह म्हणाले, "आम्हाला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 10:58 AM2021-02-27T10:58:18+5:302021-02-27T11:00:26+5:30
Congress : गोडसे समर्थकाच्या काँग्रेसमधील प्रवेशानंतर अनेकांनी व्यक्त केली नाराजी
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर पालिकेचे नगरसेवक आणि हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरसिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सन २०१७ मध्ये नथुराम गोडसेच्या प्रतीमेचे उद्घाटन करणाऱ्यांमध्ये बाबूलाल चौरसिया यांचा सक्रीय सहभाग होता. तसेच महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची शपथ घेतल्यामुळे ते चर्चेत आले होते. नगरसेवक बाबुलाल चौरसिया यांच्या पक्षप्रवेशासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते. दरम्यान, यावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी जोरदार टीका केली आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी बाबूलाल कोण आहेत असा सवाल केला. "कोण आहेत बाबूलाल चौरसिया? खुनी विचारधारा ज्यानं महात्मा गांधींची हत्या केली ती आजही जीवंत आहे. आम्हाला याची लाज वाटते," अशा शब्दात त्यांनी टीका केली. "गोडसेचं मंदिर उभारणं आणि त्यानंतर त्याला गांधींच्या विचारधारेशी एकत्र करणं हे आम्हाला योग्य वाटत नाही. यामुळेच आपण विरोध केला आहे," असं मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांनी व्यक्त केलं.
मध्य प्रदेशात पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश पार पडला. मध्य प्रदेश काँग्रेसकडून बाबुलाल चौरसिया यांच्या पक्षप्रवेशाचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले. विशेष म्हणजे बाबुलाल चौरसिया यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम करत हिंदू महासभेत प्रवेश केला होता. हिंदू महासभेच्या तिकिटावर पालिका निवडणूक लढत जिंकली होती.
मी जन्मापासूनच काँग्रेसवाला
"मी जन्मापासूनच काँग्रेसवाला आहे. नथुराम गोडसेला श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आपल्याला भाग पाडण्यात आले, असा आरोप करत आपण यापूर्वीही काँग्रेसमध्ये होतो. आपण कुटुंबात पुन्हा परतलो आहे, असं बाबुलाल चौरसिया म्हणाले.
गांधी कुटुंब मोठ्या मनाचे
"काँग्रेसने राहुल गांधींचा उल्लेख करत बाबुलाल चौरसिया यांचा पक्षप्रवेश कसा योग्य आहे, याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. हिंदू महासभेकडून निवडणूक लढत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. गांधी कुटुंब मोठ्या मनाचे आहे. त्यांच्या याच आदर्श मूल्यांमुळे गोडसेची पूजा करणारा व्यक्ती गांधींची पूजा करत आहे," असं ग्वाल्हेरमधील काँग्रेस आमदार प्रवीण पाठक यांनी सांगितलं.