केदारनाथला पोहोचले राहुल गांधी, सायंकाळी घेणार दर्शन; दोन दिवस इथेच मुक्काम...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 04:16 PM2023-11-05T16:16:46+5:302023-11-05T16:18:15+5:30
राहुल गांधींचा हा वैयक्तिक दौरा आहे.
Rahul Gandhi in kedarnath: काँग्रेस नेते खा. राहुल गांधी तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा वैयक्तिक दौरा असून, या दौऱ्यात ते बाबा केदारनाथ धामचे दर्शन घेणार आहेत. जॉली ग्रँट विमानतळावर उतरल्यानंतर राहुल केदारनाथ धाम येथे गेले, तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
#WATCH | Congress MP Rahul Gandhi reached Kedarnath Dham in Uttarakhand.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 5, 2023
(Source: AICC) pic.twitter.com/sE6G9xVPSq
दोन दिवस केदारनाथमध्ये मुक्काम
राहुल गांधी हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ धामच्या व्हीआयपी हेलिपॅडवर पोहोचले. याठिकाणी स्थानिक नागरिक आणि तीर्थक्षेत्राच्या पुजाऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. सध्या राहुल गांधी सैफ हाऊसमध्ये विश्रांती घेत आहेत. आज संध्याकाळी ते बाबा केदारनाथाचे दर्शन घेणार आहेत. रविवार आणि सोमवारी त्यांचा केदारनाथमध्येच मुक्काम आहे. त्यांच्यासाठी केदारनाथमधील गढवाल मंडल विकास निगमचे गेस्ट हाऊस बुक करण्यात आले आहे. 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास केदारनाथ धाम येथून ते दिल्लीला परततील.
आरतीसाठी उपस्थित राहणार
राहुल गांधी केदारनाथ येथील संध्याकाळच्या आरतीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते महाभिषेक पूजाही होईल. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आर सी तिवारी यांनी ही माहिती दिली. दरम्यान, प्रदेश काँग्रेस कमिटीने राहुल गांधींचा हा दौरा वैयक्तिक असल्याचे सांगितले आहे. या दोन दिवसांत ते कुठल्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.