'काँग्रेसला माझी गरज नसेल तर माझ्याकडे अनेक पर्याय...', शशी थरुर यांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 14:32 IST2025-02-23T14:31:08+5:302025-02-23T14:32:11+5:30
Shashi Tharoor: पुढील वर्षी होणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शशी थरुर यांचे विधान महत्वाचे आहे.

'काँग्रेसला माझी गरज नसेल तर माझ्याकडे अनेक पर्याय...', शशी थरुर यांचे सूचक विधान
Shashi Tharoor: 2014 साली देशात भाजपची सत्ता आल्यापासून अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसची गळती अजून सुरुच असून, यात वाढ होण्याची शक्यता आहे. यातच आता तिरुअनंतपुरमचे खासदार आणि दिग्गज काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेस हायकमांडची झोप उडू शकते. 'काँग्रेसला माझी गरज नसेल, तर माझ्याकडे इतरही कामे आहेत,' असे थरुर यांनी म्हटले आहे.
मला अनेक पर्याय खुले
मल्याळम पॉडकास्टमध्ये इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना शशी थरुर यांनी मोठे वक्तव्य केले. थरूर 2026 मध्ये होणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकीबद्दल बोलत होते. या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गरजांवर त्यांनी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, अनेक संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात हे स्पष्ट झाले आहे की, केरळमध्ये नेतृत्व स्वीकारण्यात मी इतरांपेक्षा खूप पुढे आहे. काँग्रेस पक्षाला माझा वापर करायचा असेल तर मी पक्षासाठी उपस्थित राहीन. जर त्यांना माझी गरज नसेल, तर मला इतरही कामे आहेत. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, असे तुम्ही समजू नका, असे सूचक विधान शशी थरुर यांनी केले.
केरळ काँग्रेसला नेत्याची गरज
थरुर पुढे म्हणतात, सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि केरळ काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या विनंतीवरुन मी अमेरिकेतील आरामदायी जीवन सोडले आणि पूर्णवेळ राजकारणात उतरलो. ही माझी जबाबदारी नाही, पण मी याकडे पक्षाचे लक्ष वेधले आहे. केरळ काँग्रेसमध्ये नेत्याची कमतरता असल्याचेही अनेक कार्यकर्त्यांना वाटते. यूडीएफमधील काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही मला हे सांगितले आहे. तिरुअनंतपुरममधील माझे आवाहन पक्षापेक्षा खूप मोठे आहे. लोकांना माझी बोलण्याची आणि वागण्याची पद्धत आवडते. काँग्रेसच्या विरोधात असलेले लोकही मला मत देतात, असा दावाही त्यांनी यावेळी केला.