दिल्लीमध्ये आज ठरणार काँग्रेसचे तिन्ही मुख्यमंत्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 06:24 AM2018-12-13T06:24:18+5:302018-12-13T06:24:58+5:30
सर्वाधिकार राहुल गांधींकडे : तेलंगणात आज चंद्रशेखर राव यांचा शपथविधी
नवी दिल्ली : छत्तीसगड, मध्य प्रदेश व राजस्थान या तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री कोण असावेत, याचा निर्णय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी घेणार असून, त्याची घोषणा गुरुवारी होईल, असे सांगण्यात येते. तिन्ही राज्यांत झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठरविण्याचे सर्वाधिकार राहुल गांधी यांना देण्याचे प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आले. त्यानंतर काँग्रेसचे केंद्रीय नेते लगेचच दिल्लीला गेले.
तेलंगणात मात्र टीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांचा शपथविधी उद्याच होणार आहे. मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे प्रमुख झोरामथंगा यांचा शपथविधी शनिवारी होईल, असे समजते. आपल्या मंत्रिमंडळात भाजपाला स्थान नसेल, असे झोरामथंगा यांनी जाहीर केले असून, त्यांचा पक्ष हा भाजपाप्रणित नॉर्थ ईस्ट डेमॉक्रेटिक अलायन्सचा भाग नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
छत्तीसगड व राजस्थानात कालच बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले होते. मध्य प्रदेशात मात्र आज पहाटेपर्यंत मतमोजणी सुरू होती आणि दोन्ही पक्षांत कमालीची चुरस सुरू होती. पण मतमोजणी संपल्यावर काँग्रेसला ११४, तर भाजपाला १0९ जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपण पदाचा राजीनामा देत असून, भाजपा सरकार स्थापनेचा दावा करणार नसल्याची घोषणा केली. बहुमतासाठी ११६ सदस्यांची गरज असतानाच बसपाचे दोन तर सपाचा एक असे तीन आमदार काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याची घोषणा झाली. त्यानंतर चार अपक्ष आमदारांनीही काँग्रेसला पाठिंबा दिल्याने आता त्या पक्षाकडे १२१ आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कमलनाथ व ज्योतिरादित्य सिंदिया यांनी त्यानंतर राज्यपाल आनंदीलाल पटेल यांची भेट घेऊ न सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला निमंत्रण द्यावे, अशी लेखी विनंती केली.
आता मध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया अशी चुरस आहे. या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा असली तरी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत अधिक आमदार हे कमलनाथ यांच्यामागे असल्याचे दिसून आले. तरीही निर्णय राहुल गांधीच घेणार आहेत, असे निरीक्षक शोभा ओझा यांनी सांगितले.
राजस्थानात अशोक गेहलोत की सचिन पायलट याचाही फैसला उद्याच होईल. गेहलोत पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस असून, ते याआधीही मुख्यमंत्री होते. पायलट व सिंदिया या तरुण नेत्यांना आपल्यासोबत केंद्रात ठेवायचे की या नेत्यांद्वारे दोन राज्यांना मुख्यमंत्री म्हणून तरुण चेहरा द्यायचा, हा निर्णयही राहुल गांधी यांनी घ्यायचा आहे. राजस्थानात काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेसाठी आम्हाला बोलवावे, अशी विनंती आज केली.
छत्तीसगडचा पेच
छत्तीसगडमधील आमदारांची बैठक रात्री पार पडली. तिथे प्रदेशाध्यक्ष भूपेश बाघेल यांच्याबरोबरच खासदार ताम्रध्वज साहू व टी. एस. सिंग देव यांची नावे आघाडीवर आहेत. भूपेश बाघेल यांनी राज्यात काँग्रेसला विजय मिळवून दिला असला तरी सिंग देव यांचाही त्यात मोठा वाटा होता.
ताम्रध्वज साहू हे आतापर्यंत विरोधी पक्षनेते असून, ते व बाघेल ओबीसी समाजाचेही नेते आहेत. टी. एस. सिंग देव हे राजघराण्यातील असून, छत्तीसगडमधील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून ओळखले गेले. त्यांची संपत्ती ५00 कोटी रुपयांची आहे.