वायनाडमध्ये राहुल गांधींविरोधात एनडीएचा उमेदवार ठरला, अमित शहांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 05:16 PM2019-04-01T17:16:00+5:302019-04-01T17:17:03+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यापासून हा मतदारसंघ देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे.
वायनाड - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे केरळमधीलवायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यापासून हा मतदारसंघ देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. राहुल गांधीच्या उमेदवारीवरून संतापलेल्या डाव्यांनी त्यांना पराभूत करण्याची घोषणा केली असतानाच आता भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएनेही वायनाडमधील आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. वायनाडमधून एनडीएचा घटकपक्ष असलेल्या भारत धर्म जनसेना (बीडीजेएस) चे अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
तुषार वेल्लापल्ली हे केरळमधील स्थानिक पक्ष असलेल्या भारत धर्म जनसेना पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसेच श्री नारायण धर्म परिपालन योगम (एसएनडीपी) चे उपाध्यक्षसुद्धा आहेत. त्यांच्या नावाची घोषणा करताना अमित शहा म्हणाले की, ''तुषार वेल्लापल्ली हे विकास आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने कटिबद्धतेसाठी प्रतिनिधित्व करतील. त्यांच्या मदतीने केरळमध्ये भाजपा एक राजकीय पर्याय म्हणून समोर येईल.''
I proudly announce Shri Thushar Vellappally, President of Bharat Dharma Jana Sena as NDA candidate from Wayanad.
— Chowkidar Amit Shah (@AmitShah) April 1, 2019
A vibrant and dynamic youth leader, he represents our commitment towards development and social justice. With him, NDA will emerge as Kerala's political alternative.
भाजपा आणि भारत धर्म जनसेना पक्षाची केरळमध्ये आघाडी झाली असून, हा पक्ष केरळमधील पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे. तुषार वेल्लापल्ली यांना त्रिसूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. तसेच त्यांनी प्रचारसही सुरू केला आहे. दरम्यान, राहुल गांधी वायनाड येथून लढल्यास उमेदवारीत बदल होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, राहुल गांधींविरोधात प्रबळ उमेदवार उतरवण्यासाठी वायनाडची जागा भाजपाला देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अखेरीस तुषार वेल्लापल्ली यांच्या नावावी घोषणा एनडीएकडून करण्यात आली.