‘भारत जोडो’मुळे राहुल गांधींना मोठा फायदा होणार? काँग्रेस BJPसमोर उभे करणार तगडे आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 03:06 PM2022-09-14T15:06:42+5:302022-09-14T15:11:23+5:30

आगामी काळात राहुल गांधी साडेसातीमुक्त होणार असून, भारत जोडोच्या माध्यमातून भाजपसाठी साडेसाती ठरू शकतील का, ते जाणून घ्या...

सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपने देशभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन ठराविक मतदारसंघांसाठी खास रणनीति आखली आहे. यासाठी केंद्रीयमंत्री, नेते कामालाही लागले आहेत. दुसरीकडे, मुख्य विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) सक्रीय झाले असून, देशभरात भारत जोडो यात्रा काढली जात आहे.

सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर आहेत आणि या माध्यमातून ते काँग्रेसचा कमजोर होत असलेला पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या ३५०० किमीच्या प्रवासात २०२४ साली काँग्रेस चमत्कार दाखवू शकेल का? राहुल गांधींचा हा दौरा काँग्रेसला बळकट करू शकेल का? ज्योतिषशास्त्रानुसार, भारत जोडो यात्रा कितपत यशस्वी होईल आणि त्यातून काँग्रेस पक्षाला किती फायदा होईल, ते जाणून घेऊया...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कुंडलीत तूळ राशीच्या लग्न कुंडलीत दशमेश म्हणजे सत्ता स्थानी चंद्राच्या धनु राशीमध्ये केमद्रुम योगात अडकला आहे. गेल्या ७ वर्षांपासून राहुल गांधींची शनी साडेसाती सुरू आहेत. जानेवारी २०२३ मध्ये शनीने पुन्हा कुंभ राशीत प्रवेश केल्यावर राहुल गांधी साडेसाती मुक्त होऊ शकतील. अशा स्थितीत शनी त्यांना गेल्या काही वर्षांत केलेल्या संघर्षाचा आणि ‘भारत जोडो’चा लाभ देऊ शकेल, असे सांगितले जात आहे.

भारत जोडो यात्रेला तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता सुरुवात झाली. यावेळी मकर राशीचा उदय होत होता. बुधवार, भाद्रपद शुद्ध द्वादशी, नक्षत्र श्रावण, योग शोभन आणि करण बलव होते, सदर ग्रहमान प्रवासासाठी अत्यंत शुभ मानले जाते.

मुहूर्त ग्रंथानुसार, मकर राशी ही परिवर्तनीय राशी आहे आणि श्रवण नक्षत्र हेदेखील परिवर्तनीय असल्याने या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी श्रवण नक्षत्र विशेष शुभ मानले जाते. पण चंद्र मकर राशीत असल्यामुळे चंद्र निवास दक्षिण दिशेला होता, जो उत्तर दिशेला प्रवासासाठी फारसा अनुकूल नव्हता, असे म्हटले जात आहे.

याशिवाय चंद्राची स्थिती यात्रेकरूच्या समोर किंवा उजवीकडे असणे शुभ मानले जाते. राहुल गांधी दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे प्रवास करत असतील तर चंद्र मकर राशीत म्हणजेच त्यांच्या मागे असणे प्रतिकूल मानले जात आहे. मात्र असे असले तरी, भारत जोडो यात्रा मुहूर्ताला ८० टक्के यश मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

मकर राशीतील शनी आणि चंद्राच्या वेळी सुरू झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडी यात्रेच्या मुहूर्त कुंडलीमध्ये केंद्रस्थानी शुभ ग्रह नसून, लग्न किंवा चंद्रावर कोणताही शुभ ग्रह दिसत नाही. केतू दहाव्या स्थानी विराजमान आहे. दहाव्या स्थानी शुक्र हा मंगळ सूर्यासोबत आठव्या स्थानी अस्ताला आहे. अशा परिस्थितीत या प्रवासाला काही कायदेशीर बाबींचा सामना करावा लागू शकतो.

१२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधून जाणारी ही यात्रा ८ नोव्हेंबर रोजी मेष राशीत चंद्रग्रहण झाल्यानंतर काही वादात सापडू शकते. काही काँग्रेस नेते प्रकृतीच्या कारणास्तव यात्रा मध्येच सोडून जाऊ शकतात. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला तपास यंत्रणांकडून काही कारवाई केली जाऊ शकते, ज्यामुळे १५० दिवसांच्या भारत जोडो यात्रेच्या अंतिम टप्प्यात काही अडथळे येऊ शकतात, असा दावा केला जात आहे.

एकूणच, भारत जोडो यात्रेचा संपूर्ण कार्यक्रम काँग्रेस आणि राहुल गांधी यांना चांगली लोकप्रियता देईल, जे पुढील वर्षीच्या कर्नाटक आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यात केलेल्या दाव्यांची कोणतीही पुष्टी केली गेलेली नाही.