Rahul Gandhi Astrology Kundali Predictions: राहुल गांधींवर राहुची वक्रदृष्टी! गुरु-शुक्राची महादशा; खासदारकी रद्द झाली, आता पुढे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 07:19 AM2023-03-26T07:19:09+5:302023-03-26T07:19:09+5:30

Rahul Gandhi Astrology Kundali Predictions: आताच्या घडीला राहुल गांधी यांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती फारशी चांगली नसून, आगामी काळात कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या, डिटेल्स...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरातील पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर हिंडेनबर्ग संस्थेने अदानी समूहाबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालावरून राहुल गांधी सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीकास्त्र सोडताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे, लंडन येथे केलेल्या विधानावरून राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, यासाठी भाजप आक्रमक झाल्याचे दिसत आहे. संसदेतही भाजपने हा मुद्दा लावून धरला होता.

यातच मोदी आडनावावरून केलेले विधान राहुल गांधी यांना चांगलेच भोवल्याचे पाहायला मिळत आहे. सूरत न्यायालयाने या प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर जामीनही दिला. मात्र, या आधारे लोकसभेतील राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आले. यानंतर आता वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा काँग्रेस पक्षाने अगदी देशभरात जोरदार निषेध केला. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रातील मोदी सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका करत मोठे आरोप केले. तर संसदेतही अदानी समूहाचा विषय काँग्रेसने लावून धरला होता. तत्पूर्वी ईशान्येकडील राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता.

सुरत न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधींसाठी हा काळ खूपच कठीण दिसत आहे. राहुल गांधींची जन्मकुंडली पाहता या वर्षी जुलैपर्यंतचा काळ राहुल गांधींसाठी आव्हानांचा असेल हे कळते. याचे कारण राहुच्या कुंडलीत राहु गुरुचा योग चालू आहे.

राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० रोजी नवी दिल्लीत झाला. त्यावेळी त्यांच्या कुंडलीत तूळ लग्न उदय होत होते. गुरु ग्रहही तूळ राशीमध्ये उदित होत होता. राहुल गांधीच्या कुंडलीत लग्न आणि गुरु वर्गोत्तम आहेत. सातव्या स्थानी योगकारक शनी आहे आणि दशमात लग्न स्वामी शुक्र विराजमान आहे.

कुंडलीतील या शुभ योगांमुळे राहुल गांधींना राजघराण्यासारखे परिपूर्ण आणि समृद्ध कुटुंब लाभले. दुसरीकडे, मात्र राहुल गांधी यांच्या कुंडलीत काही प्रतिकूल योगही आहे. त्यामुळे अधिक मेहनत करूनही अपेक्षित यश साध्य करता येत नाही, असे सांगितले जाते.

राहुल गांधींच्या कुंडलीत चंद्र केद्रुम योगात अडकला आहे. या योगामुळे बहुतांश वेळी बऱ्याच गोष्टींसाठी ते इतरांवर अवलंबून राहिलेले पाहायला मिळू शकतात. त्यांची दूरदृष्टी वापरण्यास असमर्थ असतात, ज्यामुळे त्यांचे नुकसान होते. बुद्धिमत्ता, परिपक्वता आणि निर्णयाचा ग्रह बुध त्यांच्या कुंडलीत ८ व्या स्थानी विराजमान आहे. इतकेच नाही तर बुध सूर्य आणि शनि यांच्यात अडकलेला आहे.

या ग्रहस्थितीमुळे राहुल गांधींना कधी कधी ठोस निर्णय घेण्यात अडचण येते आणि विरोधक त्याचा गैरफायदा घेतात. याशिवाय राहुल गांधी यांच्या कुंडलीत शनी दुर्बल राशीत आहे आणि वैवाहिक जीवनात सुखाचा कारक ग्रह शुक्र पाप ग्रहांमध्ये फसलेला आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात घरातील सुखाचा अभाव असतो, असे म्हटले जात आहे.

याशिवाय जन्म लग्न आणि नवांश कुंडली या दोन्हीमध्ये गुरु वक्री आहे. तर राहु पाचव्या भावात तर सूर्य आणि मंगळ दोघेही नवव्या भावात म्हणजेच भाग्य स्थानी बसलेले आहेत. अशा स्थितीत गुरूची दृष्टी राहु, सूर्य आणि मंगळ ग्रहावर आहे. राहुल गांधी यांची २६ डिसेंबर २०२१ पासून राहुची महादशा आणि राहुच्या महादशेत गुरुची अंतर्दशा सुरू आहे. जी २१ मे २०२४ पर्यंत सुरू राहणार आहेत.

या ग्रहदशा सुरू असतानाच मे महिन्यात कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या कालावधीत होऊ घातल्या आहेत. या निवडणुका राहुल गांधींसाठी खूप आव्हानात्मक असतील, असे सांगितले जात आहे.

याचे एक कारण असे की, यावेळी राहुल गांधी यांची मार्चपासून राहुची महादशा, गुरूची अंतर्दशा आणि शुक्राची प्रत्यंतर दशा सुरू आहे.शुक्राची ही प्रत्यंतर दशा २ मार्च २०२३ ते २६ जुलै २०२३ पर्यंत आहे. प्रत्यंतर दशानाथ शुक्र कुंडलीत दशम स्थानी लग्नेश आहे. मात्र, शुक्र पाप ग्रहांनी वेढलेला असून, एका बाजूला केतू आणि दुसऱ्या बाजूला मंगळ-सूर्य असल्याने पाप-कर्तरी दोष निर्माण झाला आहे.

येत्या जुलैपर्यंत राहुल गांधींना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार असून, विरोधक त्यांना सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत, असे सांगितले जात आहे. राहुच्या कठीण महादशेमुळे राहुल गांधींना प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.

विशोंत्तरी दशेत राहू-गुरु-शुक्र यांची कठीण महादशा सुरू असल्याने आगामी काळात राहुल गांधींना काही कायदेशीर प्रक्रियांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे त्यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

परंतु राहुल गांधी यांच्या कुंडलीत अंतर्दशानाथ गुरु ग्रह वर्गोत्तम होऊन नवांश कुंडलीत अतिशय मजबूत स्थितीत विराजमान आहे. ही जमेची बाब असून, त्यामुळे राहुल गांधी यांचे नेतृत्व आणि काँग्रेसची रणनीति यांमुळे आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीमध्ये मोठी सुधारणा दिसून येऊ शकते, असे सांगितले जात आहे.

आगामी काळात राहुल गांधी कोणती पावले उचललात आणि पुढील निवडणुकांमध्ये काँग्रेस बाजी मारण्यात यशस्वी होते की, पुन्हा एकदा राहुल गांधी यांना अपयशाला सामोरे जावे लागू शकते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.