महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 09:14 PM2024-11-21T21:14:21+5:302024-11-21T21:30:45+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: हे सर्वेक्षण 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. सर्वेक्षणाचे सॅम्पल साइज 54555 एवढे ठेवण्यात आले होते...

महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता प्रतीक्षा आहे ती 23 नोव्हेंबरला येणाऱ्या निवडणूक निकालाची. मात्र यापूर्वी, सी-व्होटरचा लेटेस्ट एक्झिट पोल समोर आला आहे. हे सर्वेक्षण 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. सर्वेक्षणाचे सॅम्पल साइज 54555 एवढे ठेवण्यात आले होते. सी-व्होटरने हा सर्व्हे सर्वच्या सर्व 288 जागांवर केला आहे.

सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 112 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला 104 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय, इतरांच्या खात्यात 11 जागा जाऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, राज्यातील 61 जागांवर अत्यंत अटीतटीचा सामना आहे. यामुळे या जागांच्या बाबतीत अत्ताच काहीही सांगणे अवघड आहे.

विभागनिहाय बोलायचे झाल्यास विदर्भातील एकूण 60 जागांपैकी महायुतीला 18 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 23 आणि इतरांना 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात 16 जागांवर अटीतटीची लढत दिसत आहे.

मराठवाड्यात एकूण 46 जागा असून, येथे महायुतीला 14 तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. 12 जागांवर निकराची लढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील एकूण 36 जागांवर, सी व्होटरच्या मते, महायुतीला 18 जागा मिळतील, तर मविआला 9 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर एक जागा इतरांना मिळत आहे. येथी 8 जागांवर अटीतटीची लढत दिसत आहे.

महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्र अत्यंत महत्त्वाचा आहे. बारामती याच विभागात येते. येथे पवार विरुद्ध पवार अशी लढत आहे. येथे अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यातच लढत आहे. युगेंद्र अजित पवारांचा पुतण्या तर शरद पवारांचा नातू आहे. या विभागात एकूण 70 जागा आहेत. येथे महायुतीला 25, तर महाविकास आघाडीला 34 जागा मिळण्याची शक्यता आहे.

ठाणे-कोकण विभागासंदर्भात बोलायचे झाल्यास, येते एकूण 39 जागा आहेत. या विभागात महायुतीला फायदा होताना दिसत आहे, तर मविआ मागे पडताना दिसत आहे. सी व्होटरनुसार, ठाणे-कोकण विभागात महायुतीला 20, महाविकास आघाडीला 8, तर इतरांना 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. येथे 9 जागांवर अटीतटीची लढत होताना दिसत आहे.