'मूड ऑफ द नेशन': देशात आज निवडणूक झाल्यास कुणाचं बनेल सरकार? जनतेचा कौल काय सांगतो वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 07:09 IST2023-01-27T06:54:56+5:302023-01-27T07:09:42+5:30

इंडिया टुडे आणि 'सी-वोटर' यांनी संयुक्त विद्यमाने केलेल्या 'मूड ऑफ द नेशन' या सर्व्हेक्षणात महत्वाची माहिती समोर आली आहे. या सर्व्हेक्षणात एनडीए सरकारच्या कामगिरीबाबत देशातील जनतेचा सध्याचा कौल कुणाच्या बाजूनं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जानेवारी २०२३ मध्ये गेल्या गेलेल्या या सर्व्हेमध्ये एकूण १ लाख ४० हजार ९१७ जणांनी सहभाग घेतला होता. यात अनेक ज्वलंत मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मतं मांडली आहेत.
मोदी सरकारच्या कारभारावर किती संतुष्ट आहात? जर आज देशात लोकसभा निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाचं सरकार बनेल? यासोबतच एनडीए सरकारचं सर्वात मोठं यश कोणतं आणि मोदी सरकारची सर्वात मोठं अपयश कोणतं? असे महत्वाचे प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले. या सर्व्हेक्षणातून काय समोर आलं हेच जाणून घेणार आहोत.
एनडीए सरकारच्या कामकाजावर ६७ टक्के लोकांनी खूप चांगला असा शेरा दिला आहे आणि ११ टक्के लोकांनी चांगलं असं म्हटलं आहे. तर १८ टक्के लोकांनी वाईट असा शेरा दिला आहे. कोरोना काळात मोदी सरकारनं केलेलं काम सरकारचं आजवरचं सर्वात मोठं यश मानलं आहे. २० टक्के लोकांनी मोदी सरकार कोरोना लढाईत यशस्वी ठरल्याचं म्हटलं आहे. तर कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला १७ टक्के, राम मंदिराच्या निर्माणाला ११ टक्के आणि जन कल्याण योजनांसाठी ८ टक्के लोकांनी मोदी सरकारचं सर्वात मोठं यश मानलं आहे.
मोदी सरकारचं सर्वात मोठं अपयश कोणतं?
वाढती महागाई हे मोदी सरकारचं मोठं अपयश जनतेनं मानलं आहे. यासाठी २५ टक्के लोकांनी महागाईवर मतदान केलं आहे. तर बेरोजगारीच्या मुद्द्याला १७ टक्के, कोरोना महामारीशी झुंज ८ टक्के आणि आर्थिक विकासाच्या मुद्द्याला ६ टक्के मतं मिळाली आहेत.
विरोधी पक्ष काँग्रेसच्या कामगिरीबाबत किती खूश?
देशात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या कामगिरीबाबत १९ टक्के जनतेनं खूप चांगल्या कामगिरीचा शेरा दिला आहे. तर १५ टक्के लोकांनी चांगला, १९ टक्के लोकांनी सरासरी आणि २५ टक्के लोकांनी खराब कामगिरीचा शेरा दिला आहे.
भारत जोडो यात्रेबाबत मत काय?
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबतही जनतेचं मत जाणून घेण्यात आलं. यात २९ टक्के लोकांनी भारत जोडो यात्रा नागरिकांशी जोडलं जाण्याच्या दृष्टीकोनातून उत्तम निर्णय म्हटलं आहे. तर ३७ टक्के लोकांनी पक्षाला मजबूत करण्यासाठी योग्य म्हटलं आहे. १३ टक्के लोकांनी यात्रा राहुल गांधींची प्रतिमा सुधारण्यासाठी टाकलेलं पाऊल असल्याचं म्हटलं आहे. तर ९ टक्के लोकांनी या यात्रेमुळे कोणताही नवा फरक पडणार नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.
काँग्रेस पक्षात कोण सुधारणा घडवून आणू शकतो?
काँग्रेस पक्षातील सुधारणेच्याबाबतीत २६ टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्यावरच विश्वास व्यक्त केला आहे. तर १६ टक्के लोकांनी सचिन पायलट यांचं नाव घेतलं आहे. १२ टक्के लोकांनी मनमोहन सिंग, तर ८ टक्के लोकांनी प्रियांका गांधी यांना पसंती दिली आहे. ३ टक्के लोकांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव घेतलं आहे.
विरोधी पक्षाला मजबूत कोण करू शकतं?
विरोधी पक्षाच्या भूमिकेसाठी लोकांनी अरविंद केजरीवाल यांना सर्वाधिक पसंती दिली आहे. २४ टक्के लोकांनी केजरीवालांचं नाव घेतलं. तर २० टक्के लोकांनी ममता बॅनर्जी यांना कौल दिला आहे. १३ टक्के लोकांनी राहुल गांधी आणि ५ टक्के लोकांनी नवीन पटनायक यांचं नाव घेतलं आहे.
कुणाला किती जागा मिळतील?
देशात आज निवडणूक झाली तर पुन्हा एकदा एनडीए सरकार येईल असं लोकांचं म्हणणं आहे. एनडीएला २९८ जागा, यूपीएला १५३ आणि इतर ९२ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मतदानाच्या टक्केवारीबाबत बोलायचं झालं तर एनडीए ४३ टक्के, यूपीएला २९ आणि इतरला २८ टक्के मतदान होऊ शकतं.
देशात आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपाला २८४ जागा, काँग्रेसला ६८ आणि इतर पक्षांना १९१ जागा मिळू शकतात असा अंदाज सर्व्हेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. मतदानच्या टक्केवारीबाबत बोलायचं झालं तर भाजपाला ३९ टक्के, काँग्रेसला २२ टक्के आणि इतर पक्षांच्या खात्यात ३९ टक्के मतदान होऊ शकतं.
कोणत्या राज्यांमध्ये एनडीएला फायदा?
आसाममध्ये १४ पैकी १२ जागा, तेलंगणामध्ये ६ जागा, पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी २० जागा आणि उत्तर प्रदेशात ८० पैकी ७० जागा एनडीएला मिळू शकतात.
यूपीएला कोणत्या राज्यांमध्ये फायदा?
कर्नाटकात यूपीएला १७ जागा मिळू शकतात. तर महाराष्ट्रातही मोठं यश मिळताना दिसून येत आहे. यावेळी महाराष्ट्रातून यूपीएला ३४ जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय बिहारमध्ये यूपीएला बंपर लॉटरी लागू शकते. यावेळी बिहारमध्ये यूपीएच्या खात्यात २५ जागा मिळू शकतात.
भारताचा पुढचा पंतप्रधान कोण?
पंतप्रधानपदी कुणाला पाहायला आवडेल यावर आजही जनतेनं नरेंद्र मोदींवर सर्वाधिक विश्वास दाखवला आहे. मोदींच्या नावाला ५२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर १४ टक्के राहुल गांधी, ५ टक्के अरविंद केजरीवाल आणि ३ टक्के लोकांनी अमित शाह यांचं नाव घेतलं आहे.
भाजपामध्ये मोदींचा उत्तराधिकारी कोण?
भाजपामध्ये मोदींनंतर जनतेनं सर्वाधिक विश्वास अमित शाह यांच्यावर व्यक्त केला आहे. त्यांना २६ टक्के मतदान, तर योगी आदित्यनाथ यांना २५ टक्के मतदान झालं आहे. याशिवाय नितीन गडकरी यांना १६ टक्के आणि ६ टक्के लोकांनी राजनाथ सिंह यांचं नाव घेतलं आहे.
उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण?
या प्रश्नाच्या उत्तरात ३९ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांचं नाव घेतलं आहे. तर १६ टक्के लोकांनी केजरीवाल यांना पसंती दिली आहे. ७ टक्के लोकांनी ममता बॅनर्जी यांना मतदान केलं आहे. तसंच ७ टक्के लोकांनी एमके स्टालिन यांना पसंती दिलीय.