मोदींविरोधात अविश्वास, राहुल पुन्हा संसदेत; आजच्या सर्वोच्च निर्णयाने राजकारण पालटणार By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 02:54 PM 2023-08-04T14:54:42+5:30 2023-08-04T15:02:39+5:30
Rahul Gandhi-Modi Surname Case: राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल झाल्याने भाजपला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. पुढील निर्णय कधी येईल माहिती नाही... तोवर राहुल खासदार राहणार हे मात्र न्यायालयाने स्पष्ट केलेय... निकाल काय येईल... काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करणारा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे भाजपाला एकप्रकारे धक्का मानला जात आहे. काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अविश्वास प्रस्ताव आणलेला असताना त्याचवेळी दुसरीकडे राहुल गांधी पुन्हा संसदेत परतणार आहेत. यामुळे पुढील राजकीय ठोकताळे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना मोठा दिलासा दिला आहे. राहुल यांच्या शिक्षेविरुद्ध अपील प्रलंबित असेपर्यंत त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे राहुल आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होऊ शकतात, असे मानले जात आहे.
शिक्षेच्या निर्णयानंतर राहुल यांची दुसऱ्याच दिवशी खासदारकी काढून घेण्यात आली होती. यामुळे लोकसभा अध्यक्ष यावर कधी निर्णय घेतात यावर देखील बरेच काही अवलंबून आहे.
राहुल गांधींचे सदस्यत्व आता बहाल करण्यात आले आहे. या अधिवेशनापासून राहुल संसदेच्या अधिवेशनात हजर होतील, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष निवडणूक आयोगाला कळवतील, त्यानंतर ते या प्रकरणी निर्णय घेतील. जर सर्व काही लवकर झाले तर राहुल गांधी सोमवारी किंवा मंगळवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होऊ शकणार आहेत.
काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावावर ८ ते १० ऑगस्ट रोजी चर्चा होणार आहे. राहुल गांधींच्या सदस्यत्वाचा निर्णय लोकसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. सभापतींनी सोमवारपर्यंत राहुल यांच्या सदस्यत्वाबाबत निर्णय घेतल्यास ते अविश्वास ठरावावरील चर्चेत सहभागी होऊ शकतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविण्याची आशा वाढली आहे. परंतू, जर तरचे ढग दाटलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राहुल गांधींच्या बाजुने लागला तर ते निवडणूक लढवू शकणार आहेत. यासाठी राहुल यांना होणारी शिक्षा ही दोन वर्षांपेक्षा कमीची असावी लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आणि आजच्या निर्णयावरून हे स्पष्ट झाले आहे की, राहुल गांधी केवळ संसदेतच परतणार नाहीत तर 2024 च्या निवडणुकीत उमेदवार म्हणूनही ते दिसणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा मोदी वि. राहुल असा सामना पहायला मिळणार आहे.