आता, कर्नाटकात महिलांना मोफत बस?; 'या' ५ आश्वासनांमुळे काँग्रेसला स्पष्ट बहुमत By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 03:34 PM 2023-05-13T15:34:26+5:30 2023-05-13T15:45:24+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर दुपारी २.३० वा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. विजयाबद्दल जनतेला धन्यवाद दिले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर दुपारी २.३० वा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. विजयाबद्दल जनतेला धन्यवाद दिले.
राहुल गांधींनी पत्रकारांना ६ वेळा नमस्कार करत कर्नाटकातील द्वेषाचा बाजार उठून प्रेमाचा बाजार भरल्याचे स्पष्ट केले. 'कर्नाटकने देशाला प्रेम पसंत असल्याचे दाखवून दिले,' असेही ते म्हणाले.
कर्नाटकच्या निवडणुकीत एकीकडे धनदांडग्या भांडवलदारांची ताकद होती. तर दुसरीकडे गरीबांची शक्ती होती. शक्तीने ताकदीचा पराभव केला. यापुढे हेच संपूर्ण देशात घडेल, असेही राहुल गांधींनी म्हटले
काँग्रेसच्या या विजयाचे देशभरात जल्लोषात स्वागत होत आहे. मोदी-शहांचा हा पराभव असल्याची टीका काँग्रेसच्या सहकारी पक्षांकडून होत आहे. आता, काँग्रेसने निवडणुकांपूर्वी दिलेल्या ५ महत्त्वाच्या घोषणांमुळेच हा विजय झाल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेसने कर्नाटक निवडणुकांसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या लोकांकडे विशेष लक्ष देण्यात आले. तर, काँग्रेसने बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी केली असून कर्नाटकात त्यांचे सरकार स्थापन झाल्यास त्यावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे.
कर्नाटकात सरकार आल्यावर प्रत्येक कुटुंबाला दरमहा २०० युनिट वीज मोफत दिली जाईल, असे आश्वासन काँग्रेसने जाहीरनाम्यात दिले. यासोबतच प्रत्येक कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा २००० रुपये देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दरमहा १० किलो धान्य देण्याची घोषणाही काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने एकूण ५ महत्त्वाच्या घोषणा गरिबांसाठी केल्या आहेत.
युवक निधी योजनेंतर्गत बेरोजगारांना २ वर्षांसाठी दरमहा ३००० रुपये आणि डिप्लोमाधारकांना १५०० रुपये प्रति महिना दिले जातील, असंही जाहीरनाम्यात आहे.
कर्नाटकमधील महिलांना सार्वजनिक बससेवा मोफत देण्याचेही आश्वासन काँग्रेसने दिल होते. आता, कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यामुळे, प्राधान्याने या ५ आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी काँग्रेसची असणार आहे.
विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही निवडणुकांच्या आदल्यादिवशी ट्विट करुन ५ आश्वासनांच्या पूर्तीसाठी काँग्रेसला मतदान करा, राज्यात सत्तांतर घडवा, असे आवाहन केले होते.