राहुल गांधींसोबत असणार चक्क एक 'चालतं फिरतं गाव'; 3670Km ची 'भारत जोडो' यात्रा अशी पूर्ण होणार! By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 12:17 PM 2022-09-07T12:17:42+5:30 2022-09-07T12:29:51+5:30
Bharat Jodo Yatra: २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी आता काँग्रेसनंही कंबर कसली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी देशात भारत जोडो यात्रा काढणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. तसंच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. राहुल गांधींसोबत जवळपास ३०० लोक यात्रा करणार आहेत. राहुल गांधी या यात्रेत कोणत्याही हॉटेलमध्ये थांबणार नाहीत. तर त्यांच्यासोबत यात्रा करणारेच त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी 'भारत जोडो' यात्रा काढत आहेत. कन्याकुमारीपासून सुरू होणारी ही यात्रा कश्मीरमध्ये संपणार आहे. १५० दिवसांची काँग्रेसची ही यात्रा देशातील १२ राज्यांमधून जाणार आहे आणि एकूण ३५७० किमी अंतर कापणार आहे.
राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते आणि सिव्हील सोसायटीशी निगडीत जवळपास ३०० लोक पदयात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रेत राहुल गांधी कोणत्याही हॉटेलमध्ये थांबणार नाहीत असं याआधीच काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. फाइव्ह स्टार हॉटेलच्या माध्यमातून नव्हे, तर राहुल गांधी सर्वसाधारण पद्धतीनं जनतेसोबत राहत आपला दौरा पूर्ण करणार आहेत असं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मग या पाच महिन्यांच्या यात्रेत राहुल गांधी नेमकं राहणार कुठं? खाणार काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याची माहिती समोर आली आहे.
राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत यात्रेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींचं जेवण, राहण्याची व्यवस्था, रात्रीचा मुक्काम नेमका कसा असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ३५७० किमीच्या भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधी यांच्यासाठी एक खास चालता-फिरता कंटनेर तयार करण्यात आला आहे. राहुल गांधी याच कंटनेरमध्ये राहणार आहेत. ज्यात झोपण्यासाठी बेड, टॉयलेट आणि काही कंटनेर वाहनांमध्ये एसीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
भारत जोडो यात्रेवेळी काही राज्यांमध्ये अत्यंत उष्ण हवामान असेल त्यामुळे कंटनेरमध्ये एसीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ३५७० किमीच्या प्रवासात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं उष्ण वातावरण असणार आहे. याची काळजी घेत राहुल गांधी यांच्या प्रवासासाठी एक कंटनेर वाहन तयार करण्यात आले आहेत. कंटनेरमध्ये टॉयलेट सोबतच झोपण्याची, जेवणाची आणि इतर व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे हॉटेल संस्कृतीपासून दूर राहून सर्वसामान्यांसोबतच राहण्याचा मानस राहुल गांधी यांचा आहे.
राहुल गांधींची राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्याऐवजी कंटनेरलाच एका छोट्या घराचं रुप देण्यात आलं आहे. याच कंटनेरमध्ये राहुल गांधी पाच महिने प्रवास करणार आहेत. तसंच इतर नेत्यांसोबत तंबू टाकून चर्चा आणि जेवण करतील. हे खास कंटनेर राहुल गांधींसोबत २४ तास नसतील. ते फक्त रात्री ज्या ठिकाणी यात्रा थांबणार आहे त्याठिकाणी सर्व कंटनेर पोहोचतील. रात्रीची झोप आणि सकाळी आवरण्यापूरतं राहुल गांधी या कंटनेरमध्ये वास्तव्याला असणार आहेत. इतरवेळी ते पदयात्रेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणार आहेत.
राहुल गांधी यांच्यासाठी कंटनेर ट्रेक वेगळा असणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ते कंटनेरमध्ये एकटेच असतील. तर इतर कंटनेर ट्रकमध्ये प्रत्येकी १२ जणांच्या झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावागावात जिथं कंटनेर ट्रक्स थांबतील तिथंच बाजूला तंबू टाकले जातील आणि याठिकाणी राहुल गांधी सर्वांशी चर्चा करतील. कार्यकर्त्यांसोबत जेवण आणि गप्पा होतील. पक्षासंबंधी चर्चा देखील याच ठिकाणी केली जाईल.
दररोज २२-२३ किमी यात्रा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारीपासून सुरुवात होणार आहे. याठिकाणाहूनच काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते सहभागी होतील. ही यात्रा पाच महिने चालणार आहे तसचं सर्व कार्यकर्त्यांना कपडे धुण्याची व्यवस्था तीन दिवसातून एकदाच उपलब्ध करुन दिली जाईल असं याआधीच सांगण्यात आलेलं आहे. दिवसभरात यात्रा २२ ते २३ किमी अंतर कापणार आहे. दररोज सकाळी सात वाजताच्या सुमारास यात्रेला सुरुवात होईल आणि सकाळी १० वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर काही तास आरामासाठी असतील. त्यानंतर ३.३० वाजता यात्रेला पुन्हा सुरुवात होईल आणि रात्री ७ वाजता यात्रा संपेल.
राहुल यांच्यासोबत ३०० लोक काँग्रेसनं भारत जोडो यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. या यात्रेचं नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. तर त्यांच्या पक्षाचे एकूण ११७ नेते त्यांच्यासोबत असणार आहेत. तसंच २८ महिला नेत्यांच्याही यात समावेश आहे. महिला नेते आणि कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी वेगळे कंटेनर असणार आहेत. काँग्रेससोबतच सीव्हील सोसायटीशी निगडीत लोक, सुरक्षारक्षक, पक्षाच्या कम्युनिकेशन सेलचे सदस्य यात फोटोग्राफर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळणारे लोक आणि सोबतच मेडिकल टीमचे सदस्यही यात्रेत असणार आहेत. या सर्वांची संख्या मिळून ३०० जण राहुल गांधी यांच्यासोबत असणार आहेत.
काँग्रेस नेतेच तयार करणार जेवण भारत जोडो यात्रेत सहभागी काँग्रेस नेते आपली न्याहारी, जेवण स्वत:च तयार करणार आहेत. तर काही ठिकाणी स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या यात्रेसाठी कोणत्याही थर्ड पार्टीला जोडण्यात आलेलं नाही. सर्व काम काँग्रेस नेते आणि पदाधिकारीच हाताळणार आहेत. तसंच राहुल यांच्यासोबत चालणारे सर्व नेते व पदाधिकारी एकत्रच नाश्ता आणि जेवण एकाच तंबूखाली करणार आहेत.
भारत जोडो यात्रा काँग्रेसला संजीवनी देणार? भारत जोडो यात्रेतून काँग्रेसला संजीवनी देण्यात राहुल गांधी यांना यश येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. राहुल गांधी या यात्रेत हातात तिरंगा घेऊन चालणार आहेत. तसंच भारत जोडो यात्रेचं एक टायटल साँग तयार करण्यात आलं आहे. हे टायटल साँग संपूर्ण यात्रेत ऐकू येणार आहे. तसंच कन्याकुमारीपासून ते काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशपर्यंत ही यात्रा होणार आहे.