कुस्तीच्या आखाड्यात उतरले राहुल गांधी, बजरंग पुनियासोबत लढवला डाव, WFI मधील वादाबाबतही केली चर्चा By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 12:29 PM 2023-12-27T12:29:54+5:30 2023-12-27T12:33:49+5:30
Rahul Gandhi : भारतीय कुस्ती महासंघ आणि काही कुस्तीपटूंमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी हरियाणातील बहादूरगडमधील छारा गावाला भेट दिली. झज्जरजवळील छारा गावात असलेल्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये राहुल गांधी सुमारे अडीच तास थांबले होते. भारतीय कुस्ती महासंघ आणि काही कुस्तीपटूंमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी हरियाणातील बहादूरगडमधील छारा गावाला भेट दिली. झज्जरजवळील छारा गावात असलेल्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये राहुल गांधी सुमारे अडीच तास थांबले होते.
यावेळी राहुल गांधी यांनी कुस्तीपटू बजरंग पुनियासोबत कुस्तीचे धडे घेत काही डावही खेळले. तसेच कुस्तीपटूंच्या दैनंदिन कार्यक्रमाची माहिती घेतली.
राहुल गांधी यांनी छारा गावातील ज्या लाल दीवान चंद कुस्ती आणि योग केंद्राला भेट दिली त्याच आखाड्यामधून बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी कुस्तीचे प्राथमिक धडे घेतले होते.
राहुल गांधी यांनी येथे कुस्तीपटू बजरंग पुनियासोबत नेटवर कुस्ती खेळली. तसेच इतर कुस्तीपटूंसह कसरती करत घाम गाळला. राहुल गांधी हे पैलवानांच्या दैनंदिनीबाबत माहिती घेण्यासाठी येथे आले होते, अशी माहिती बजरंग पुनिया याने दिली.
या आखाड्याचे संचालक आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांचे प्रशिक्षक वीरेंद्र दलाल यांनी सांगितले की, राहुल गांधी हे अचानक आखाड्यात आल्याने त्यांना पाहून कुस्तीपटूंना आनंद झाला. राहुल गांधी यांनी अगदी साधेपणाने मॅटवर बसून कुस्तीपटूंशी संवाद साधला. कुस्तीचे प्राथमिक धडे समजून घेतले. तसेच त्यांनी बाजरीची भाकरी आणि मोहरीच्या भाजीचाही आस्वाद घेतला.
प्रशिक्षक आर्य वीरेंद्र दलाल यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्यासोबत कुस्ती महासंघामध्ये सुरू असलेल्या वादाबाबतही चर्चा झाली. या वादामुळे खेळाडूंचं खूप नुकसान झालं आहे. कुस्तीपटू मानसिकदृष्ट्या त्रस्त झालेले आहेत. राहूल गांधीनीही त्यांना सांगितले की, सरकारने खेळाडूंचं म्हणणं ऐकलं पाहिजे.
आखाड्यातील कुस्तीपटूंचं भोजन बनवणाऱ्या आचाऱ्यानेही राहुल गांधींनी त्यांच्या हातची भाकरी खाल्ल्याने आनंद व्यक्त केला आहे.
राहुल गांधी हे येथील आखाड्यामध्ये सुमारे अडीच तास थांबले होते. मात्र यावेळी काँग्रेसचे कुणीही नेते उपस्थित नव्हते. या कार्यक्रमाची माहिती इतर कुणालाही देण्यात आली नव्हती, असे सांगण्यात येत आहे.