Rahul Gandhi: भारत जोडो यात्रा उंबरठ्यावर, महाराष्ट्रात राहुल गांधी ३८४ किमी चालणार By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 08:31 PM 2022-11-06T20:31:15+5:30 2022-11-06T22:28:33+5:30
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तेलंगाणा राज्याच्या सीमेपासून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्या दृष्टीने जयत तयारी केली जात आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तेलंगाणा राज्याच्या सीमेपासून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्या दृष्टीने जयत तयारी केली जात आहे.
महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचे 14 मुक्काम, 10 कॉर्नर सभा, तर दोन भव्य सभा देखील होणार आहेत. सुरक्षेच्या कारणांमुळे अकोला जिल्ह्यात राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत.
सोमवारी सकाळी देगलूर मार्गे ही यात्रा महाराष्ट्रात पोहोचणार आहे. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात 14 मुक्काम होणार आहेत. दरम्यान पहिली सभा ही 10 नोव्हेंबरला नांदेड इथं तर दुसरी सभा 18 नोव्हेंबरला गजानन महाराजांच्या शेगावात होणार आहे.
राहुल गांधींच्या मुक्कामासाठी यात्रेच्या मार्गावरील जवळपास सर्वच मंगल कार्यालये बुक करण्यात आली आहेत. जिथं कार्यकर्त्यांना मुक्काम करता येणार आहे. महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यात मिळून यात्रेचा 384 किलोमिटरचा प्रवास होणार आहे
‘भारत जोडो यात्रेचे’ नागपूर जिल्ह्यातील गावागावांत थेट प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. त्यासाठी एलसीडी प्रोजेक्टर लावलेले प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक असे एकूण सहा रथ तयार करण्यात आले आहेत.
११ नोव्हेंबरपासून हे रथ तालुक्याच्या ठिकाणी, बाजारपेठांमध्ये, आठवडी बाजारात उभे करून लोकांना लाईव्ह यात्रा दाखवून वातावरणनिर्मिती केली जाईल. एवढेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते यात्रेत प्रत्यक्ष सहभागी झाल्यावर त्याचे प्रक्षेपणही केले जाणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते १८ नोव्हेंबरला सकाळी ६.३० वाजता अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात पदयात्रेत सहभागी होतील. दुपारी शेगाव येथे पोहोचतील व सायंकाळी ४ वाजता आयोजित जाहीर सभेत सहभागी होतील.
नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे हेही सहभागी होणार आहेत.
उद्धव ठाकरेंनी आपल्या सहभागाबाबत अद्यात अंतिम निर्णय जाहीर केला नाही, पण शिवसेनेचे प्रमुख नेते भारत जोडो यात्रेत राहुल गांधीसमवेत सहभागी होतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू असून राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये राहुल गांधींच्या यात्रेत शरद पवारांच्या सहभागाने उत्सुकता आहे. त्यामुळे, राहुल गांधींना महाराष्ट्रात किती प्रतिसाद मिळतो हे आगामी १५ दिवसांत कळेल.