This slogans is the decisive factor in the Indian elections
गरिबी हटाओ ते अबकी बार... या घोषणा ठरल्या निवडणुकांमध्ये निर्णायक By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 10:12 AM2019-03-25T10:12:05+5:302019-03-25T11:06:06+5:30Join usJoin usNext 17व्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागला आहे. प्रचारादरम्यान मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध घोषणाही दिल्या जाऊ लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतातील निवडणुकांमध्ये लक्षवेधी ठरलेल्या घोषणांचा घेतलेला हा आढावा. जय जवान; जय किसान - 1965 च्या युद्धावेळी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. पुढे लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला या नाऱ्याचा मोठा फायदा झाला होता. गरीबी हटाओ - 1971 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी दिलेला गरिबी हटाओचा नारा आजही सर्वांच्या स्मरणात आहे. काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर एकट्याने निवडणूक लढवताना इंदिरा गांधी यांनी 'गरीबी हटाओ' या नाऱ्याच्या जोरावर मोठा विजय मिळवला होता. इंदिरा हटाओ देश बचाओ - 1975 साली देशात लागलेल्या आणीबाणीनंतर लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी 'इंदिरा हटाओ, देश बचाओ' हा नारा प्रसिद्ध झाला होता. राजा नहीं फकीर है, देश की तकदीर है - 1989 मध्ये विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी काँग्रेसला शह दिला होता. त्यावेळी विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या समर्थकांनी 'राजा नहीं फकीर है, देश की तकदीर है' हा नारा प्रचारात आणला होता. तर काँग्रेसने त्याला प्रत्युत्तर देताना 'फकीर नहीं राजा है, सीआईए का बाजा है' हा नारा देण्यास सुरुवात केली होती. मिले मुलायम-कांशीराम, हवा हो गए जय सिया राम - बाबरी मशिदीच्या पतनानंतर निर्माण झालेल्या राम मंदिराच्या लाटेला थोपवण्यासाठी मुलायम सिंह यादव आणि काशीराम यांनी आघाडी केली होती. या आघाडीने भाजपाला 1993 मध्ये उत्तर प्रदेशात सत्तेवर येण्यापासून रोखले होते. तेव्हा हा नारा उत्तर प्रदेशात सपा-बसपा समर्थकांमध्ये चर्चेत आला होता. तिलक, तराजू और तलवार, इनको मारो जूते चार - 80 च्या दशकात मायावतींचा उत्तर प्रदेशमधील राजकीय पटलावर उदय होत असताना त्यांनी हा नारा दिला होता. मात्र त्यावरून विवादही झाला. पुढेे 2007 मध्ये मायावतींनी सोशल इंजिनियरिंगच्या नावाखाली सवर्णांनाही आपल्या पक्षाच्या छायेत घेतले. अबकी बारी अटल बिहारी - नव्वदच्या दशकात भारतीय जनता पक्ष काँग्रेसला पर्याय म्हणून वेगाने समोर आला. त्यानंतर 1996 च्या निवडणुकीत भाजपाने 'सबको देखा बारी बारी, अबकी बारी अटल बिहारी' हा नारा दिला होता. त्यावेळी भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तसेच त्यांचे पहिलै औट घटकेचे सरकारही स्थापन झाले होते. कांग्रेस का हाथ, आम आदमी के साथ - 2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयी लोकप्रियतेच्या शिखरावर असतान इंडिया शायनिंगची वातावरणनिर्मिती करत भाजपा लोकसभा निवडणुकीला सामोरा जात होता. त्यावेळी काँग्रेसने 'कांग्रेस का हाथ, आम आदमी के साथ' हा नारा प्रचारात आणून यश मिळवले होते. अबकी बार, मोदी सरकार - 2014 मध्ये प्रचंड प्रचार यंत्रणा, सोशल मीडिया हाताशी घेत नरेंद्र मोदी यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी 'अबकी बार, मोदी सरकार' हा नारा खूप गाजला होता. कट्टर सोच नहीं, युवा जोश - 2014 मध्ये निवडणुकीच्या प्रचाराची धुरा राहुल गांधींकडे सोपवताना काँग्रेसने हा नारा दिला होता. मात्र त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. मोदी है तो मुमकिन है - 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने हा नारा दिला आहे. चौकीदार चोर है - राफेल विमान करारावरून काँग्रेसने भाजपाची चांगलीच गोची केली आहे. दरम्यान, 'चौकीदार चोर है' चा नारा प्रत्येक सभेत देत राहुल गांधी मोदींविरोधात वातावरण निर्मिती करत आहेत, तर मै हूं चौकीदार असा प्रतिनारा देत भाजपाकडून या आव्हानातील हवा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. टॅग्स :लोकसभा निवडणूककाँग्रेसभाजपाराजकारणनरेंद्र मोदीराहुल गांधीLok Sabha Election 2019congressBJPPoliticsNarendra ModiRahul Gandhi