'INDIA' आघाडीतील मित्रपक्षानेच केला काँग्रेसचा गेम; राहुल गांधींची वायनाडमध्ये कोंडी By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 04:36 PM 2024-04-05T16:36:28+5:30 2024-04-05T16:45:58+5:30
Waynad Loksabha Election 2024: वायनाडमध्ये राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु यंदा या निवडणुकीत इंडिया आघाडीतील मित्रपक्षानेच राहुल गांधींना कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. सीपीआयसह भाजपाने या मतदारसंघात तगडे उमेदवार दिलेत. त्यात काँग्रेसला मुस्लीमविरोधी असल्याचा आरोप सीपीआयकडून केला जात आहे. वायनाड इथं राजकीय गणित पाहता राहुल गांधींसाठी हा मतदारसंघ सुरक्षित मानला जातो. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत अमेठीमधून न लढता काँग्रेसनं वायनाडवर भरवसा ठेवला. परंतु इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या सीपीआयनं काँग्रेसविरोधात मजबूत उमेदवार देत राहुल गांधींच्या संसदेतील मार्गात अडथळा आणला आहे. त्याचसोबत यंदा भाजपाकडूनही वायनाडमध्ये विशेष लक्ष देण्यात आलं आहे.
सीपीआयचे महासचिव डी राजा यांच्या पत्नी एनी राजा वायनाडमधून उमेदवार आहेत. त्यात CPI च्या राष्ट्रीय कार्यकारणी समितीच्या सदस्या राहिल्यात. तर भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष वायनाड जिंकण्यासाठीच मैदानात उतरलेत. वायनाडमध्ये राहुल गांधींना घेरण्यासाठी सीपीआयनं अनेक मुद्दे पुढे केलेत. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत भर पडलीय.
CPI चा मजबूत उमेदवार - इंडिया आघाडीत असल्यानं सीपीआय राहुल गांधींविरोधात उमेदवार देणार नाही किंवा तुलनेनं कमकुवत उमेदवार देईल असं बोललं जातं होते. पण सीपीआयनं एनी राजा यांना वायनाडमधून उतरवलं. त्यामुळे यंदा वायनाड जिंकायचा चंग त्यांनी बांधल्याचं दिसते.
इतकेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आणि सीपीआयचे प्रमुख नेते विजयन सातत्याने वायनाडचा दौरा करतायेत. अनेक मुद्द्यांवरून त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना कोंडीत पकडलं आहे. CAA वर काँग्रेसचं मौन, डाव्यांसाठी प्रमुख मुद्दा - मुस्लीम समुदायाच्या समर्थनाशिवाय वायनाड जिंकणं कठीण आहे.
त्याचसाठी केरळमधील डाव्यांच्या सरकारचे मुख्यमंत्री विजयन हे सीएए कायद्याला टार्गेट करतायेत. केरळ सरकार या कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टात गेलंय. मुख्यमंत्री पी. विजयन अनेक रॅलीमध्ये हा प्रमुख मुद्दा मांडतायेत. लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे.
विशेष म्हणजे सीएए कायद्याविरोधात थेट परिणाम भाजपावर पडत नाही तर काँग्रेसवर होत आहे. कारण काँग्रेस द्विधा मनस्थितीत आहे. कारण आत्तापर्यंत केरळमधील डाव्या पक्षांमध्ये हिंदू पक्षाचे बिरूद काँग्रेसच्या नावावर आहे. CAA विरोधात बोलल्यास त्यांच्या हिंदू मतांमध्ये फूट पडू शकते अशी भीती त्यांना आहे. डाव्यांप्रमाणे सीएए विरोधात कठोर भूमिका न घेतल्याने मुस्लीम मतदार सीपीआय(एम) कडे झुकतील अशी भीती काँग्रेसला आहे.
पी विजयन वायनाडमध्ये प्रचार करतायेत की, जेव्हा ५ वर्षापूर्वी संसदेत नागरिकता संशोधन विधेयकावर चर्चा झाली तेव्हा केरळमधील लोकांचा आवाज राहुल गांधींनी का पोहचवला नाही? मुख्यमंत्री सातत्याने काँग्रेसला लक्ष्य करतायेत. भारत जोडो न्याय यात्रेतही राहुल गांधींनी सीएए कायद्याविरोधात मौन का बाळगलं असा सवाल डावे करतायेत.
वायनाडमध्ये उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधींच्या रॅलीत इंडियन यूनियन मुस्लीम लीगचे झेंडेही दिसले नाहीत. त्यावरूनही काँग्रेसला टार्गेट केले जात आहे. IUML केरळमध्ये काँग्रेस नेतृत्वातील UDF आघाडीचा प्रमुख भाग आहे. मात्र राहुल गांधींच्या रॅलीत त्यांच्या घटकपक्षाचे झेंडेच गायब होते. राजकीय पक्षांऐवजी राहुल गांधींच्या रोड शोमध्ये भारतीय झेंडा आणि तिरंगा असलेला फुगे होते. डाव्यांनी हादेखील मुद्दा बनवला आहे
केरळमध्ये जोपर्यंत भाजपा मजबूत नव्हती तोपर्यंत हिंदू मते काँग्रेसला मिळत होती. परंतु यंदा सीपीआयनं काँग्रेसला केरळमध्ये मुस्लीमविरोधी म्हणून टार्गेट केले आहे. त्यातच भाजपानेही वायनाडमध्ये तगडा उमेदवार दिला आहे. सुरेंद्रन केरळमध्ये अनेकदा निवडणुकीत उभे राहिलेत. मागील विधानसभा निवडणुकीत ते थोडक्यात आमदार होण्यापासून वंचित राहिले. जर यंदा हिंदू मतांची विभागणी झाली आणि मुस्लीम मते सीपीआयसोबत गेली तर राहुल गांधींना वायनाडमधूनही पराभवाचा सामना करावा लागू शकतो.
वायनाडमध्ये काय आहे मतांचे गणित? - वायनाडमध्ये हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समुदायांची संख्या ४०-४५ टक्के आहे. या लोकसभा मतदारसंघात ४० टक्के मुस्लीम मते आहेत. तर ४० टक्के हिंदू आणि २० टक्के मते ईसाई समुदायाची आहेत. सीपीआय उमेदवार एनी राजा ईसाई आहेत. त्यात सीपीआयनं मुस्लीम मते मिळवण्यात यश मिळवले तर राहुल गांधींसमोर अडचण वाढू शकते. कारण ईसाई आणि मुस्लीम एकूण मते ६०-६५ टक्के होतात.