अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावरून महाविकास आघाडीत संभ्रम; भाजपाला पोषक भूमिका By प्रविण मरगळे | Published: February 12, 2021 08:55 AM 2021-02-12T08:55:04+5:30 2021-02-12T09:00:58+5:30
Ajit Pawar Statement on EVM: गेल्या काही वर्षापासून विरोधक EVM मशिनवर शंका उपस्थित करत आहेत, काही दिवसांपूर्वी नाना पटोलेंनी राज्यातील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर करावा यासाठी कायदा आणण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष असताना दिली होती. राज्यात पुन्हा EVM चा मुद्दा ऐरणीवर आला आहे, काँग्रेसने अनेकदा EVM मशिनवर आक्षेप आणि शंका उपस्थित केली होती, EVM वरून बऱ्याचदा भाजपा आणि विरोधकांमध्ये वादंग निर्माण झाले होते, EVM मध्ये फेरफार करून भाजपा निवडणुका जिंकते असा आरोप विरोधक करत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी सगळ्यांनी EVM ला विरोध केला होता.
काही दिवसांपर्वी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मतदारांना ईव्हीएमसोबतच मतपत्रिकेचाही पर्याय मिळण्यासाठी कायदा करावा असे आदेश दिले होते,अशा प्रकारे कायदा झाल्यास आणि त्या मंजुरी मिळाल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध होऊ शकत होता. परंतु नाना पटोलेंच्या आदेशामुळे EVM पुन्हा चर्चेत आलं,
नाना पटोले यांनी सांगितले होते की, भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद ३२८ प्रमाणे राज्यातील निवडणुकांबाबत कायदा तयार करण्याचे अधिकार राज्य विधानमंडळाला आहेत. अनुच्छेद ३२८ नुसार राज्य विधानमंडळाला असलेल्या अधिकारानुसार कायदा तयार करुन राज्यातील जनतेला ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या.
परंतु नाना पटोलेंच्या भूमिकेनंतर राजकीय उलथापालथ झाली, नाना पटोलेंना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर नेमणूक करण्यात आली, दरम्यान नाना पटोलेंनी EVM बद्दल जे सांगितलं होतं, त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे.
नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष असताना ईव्हीएमवर भाष्य केले होते, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते काही बोलले नाहीत, त्यामुळे ती काँग्रेसची भूमिका आहे असं म्हणता येत नाही, पण ईव्हीएम मशिन असताना काँग्रेसचं सरकार राजस्थान, पंजाबमध्ये आलंय ना...बहुमताने जिंकल्यावर सगळं काही ठीक असते असं अजित पवार म्हणाले.
तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा जास्त मतांनी पराभव झाला तर ईव्हीएम मॅनेज केलं आहे, EVM वर माझा पूर्ण भरवसा आहे. मी सहा ते सात वेळा निवडणूक लढली आहे. ज्यात ईव्हीएमचा वापर झाला, ईव्हीएमवर योग्य मतदान आणि आकडेवारी दाखवली जाते असं सांगत अजित पवारांनी ईव्हीएमवर विश्वास दाखवला आहे.
अजित पवार २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १ लाख ६५ हजार मतांनी विजयी झाले होते, अजित पवारांनी केलेल्या विधानाला यासाठी महत्त्व आहे कारण काही वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने EVM बाबत शंका उपस्थित केली होती, खुद्द अजित पवारांनीही ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते,
लोकसभा निवडणुकीत भाजपाला केंद्रात बहुमत मिळालं तसेच राज्यातही भाजपाला त्यांच्या आधीच्या जागा राखण्यात यश मिळालं, त्यावेळी राज्यातील शिवसेना वगळता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत EVM च्या विरोधात एल्गार पुकारला होता, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी लावून धरली होती.
राज ठाकरे, अजित पवार, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेते एकाच व्यासपीठावर आले होते, तेव्हा अजित पवार म्हणाले होते की, बहुतांश देशात EVM वर निवडणुका होत नाहीत असं अनेक राजकीय पक्ष, एनजीओ यांनी भूमिका घेतली आहे, पारदर्शक निवडणुका व्हायला हव्यात. EVM बद्दलच्या शंका घेण्यास निश्चितपणे वाव आहे असं अजितदादांनी सांगितले होते,
तसेच निवडणुका पारदर्शक होत असतील तर बॅलेटवर मतदान घेण्यास काय हरकत आहे? जनतेला ज्याला बहुमत द्यायचं आहे त्यांनी द्यावं पण पारदर्शकता यायला हवा. ज्यांनी मतदान केलेले आहे त्यालाही आपण त्याच उमेदवार आणि चिन्हाला मतदान केलं आहे का? हे समजलं पाहिजे. ईव्हीएमवर अनेकांनी शंका घेतल्या आहेत असंही अजित पवार म्हणाले होते.
एकंदर पाहता अजित पवारांनी यापूर्वी EVM वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र अचानक EVM वर माझा पूर्ण भरवसा आहे या विधानानं राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय अशी चर्चा सुरू आहे. कारण राज्यातील सत्तासंघर्षात ७२ तासांचे सरकार कोणीही विसरू शकत नाही. अजित पवारांनी पहाटेच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली होती, त्यामुळे अजित पवारांनी घेतलेली ही भूमिका भाजपाला पोषक आहे.