coronavirus: आता तर हद्दच झाली! प्रसिद्धीलोलूप भाजपा नेत्याने चक्क शववाहिन्यांसोबत केले फोटोसेशन By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 09:39 AM 2021-04-20T09:39:41+5:30 2021-04-20T09:44:15+5:30
Politics News : एखादे काम केले की, त्याची पुरेपूर प्रसिद्धी करण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते आग्रही असतात. दरम्यान, सध्याच्या कोरोनाकाळात तर भाजपाच्या एका प्रसिद्धीलोलूप नेत्याने तर हद्दच केली आहे. एखादे काम केले की, त्याची पुरेपूर प्रसिद्धी करण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते आग्रही असतात. दरम्यान, सध्याच्या कोरोनाकाळात तर भाजपाच्या एका प्रसिद्धीलोलूप नेत्याने तर हद्दच केली आहे.
मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये भाजपाचे उपाध्यक्ष आणि माजी महापौर आलोक वर्मा हे या प्रकरणी टीकेचा विषय ठरले आहेत. त्यांनी आपल्या भागातील रुग्णालयांना शववाहिन्या उपलब्ध करून दिल्या. मात्र या शववाहिन्यांसोबत त्यांचा फोटो प्रसिद्ध झाल्याने काँग्रेसने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भोपाळचे माजी महापौर असलेल्या आलोक वर्मा यांनी सोमवारी भोपाळमधील सहा मोठ्या रुग्णालयांना सहा शववाहिन्या दिल्या. त्यावेळी जेपी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांसह भाजपाचे नेते उपस्थित होते. रुग्णालय व्यवस्थापनाला ही वाहने सुपुर्द करण्यापूर्वी एकापाठोपाठ एक अशी उभी करण्यात आली. त्यानंतर या नेताजींनी त्यांच्यासमोर उभे राहून फोटो काढले. मग ही वाहने रवाना करण्यात आली.
फोटो काढताना शववाहिनीच्या चालकाला पीपीई किट घालून माजी महापौरांसोबत उभे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंरत काँग्रेसने त्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपाच्या नेत्यांना थोडीतरी लाज वाटली पाहिजे. ऑक्सिजन टँकर्सना थांबवून फोटोसेशन केल्यानंतर आता शववाहिन्यांसोबतसुद्धा भाजपाचे माजी महापौर आलोक वर्मा यांनी फोटो काढले, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी केली.
दरम्यान, हा कार्यक्रमसुरू असताना एका पीडित व्यक्तीने आपल्या नातेवाईकाचे पार्थिव स्मशानात नेण्यासाठी वाहनाची मागणी केली. मात्र त्यालाही काहीकाळ वाट बघायला लावण्यात आली, असा आरोप काँग्रेसने केला. मात्र भाजपा नेते आलोक वर्मा यांनी हे आरोप फेटाळून लावले. या शववाहिन्या रुग्णालयांना देण्यात आल्यानंतर माझ्यासमोरच एका व्यक्तीला त्वरित शववाहिनी उपलब्ध करून देण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
मी चांगल्या हेतूने शववाहिन्या रुग्णालयाला दिल्या. मात्र काँग्रेसने ही बाब चुकीच्या पद्धतीने मांडली. त्यामुळे मला खूप दु:ख झाले आहे. मला लोकांचे सतत फोन येत आहेत. त्यांना यातील खरं जाणून घ्यायचं आहे. आता मी कुणाकुणाला स्पष्टीकरण देत बसू, असे उद्विग्न उद्गार भाजपा नेते आलोक वर्मा यांनी काढले.