अशी झाली सचिन पायलट यांची काँग्रेसमध्ये घरवापसी, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 01:34 PM 2020-08-11T13:34:55+5:30 2020-08-11T14:00:16+5:30
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायटल यांच्यातील मनभेद दूर झाले नसले तरी सध्यातरी या दोघांचीही गळाभेट घडवून आणण्याची तयारी पक्षश्रेष्ठींनी केली आहे. सचिन पायलट यांचे राजकीय नाराजी नाट्य जेवढे नाट्यमय होते तेवढ्याच नाट्यमयरीत्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्टींनी या नाराजीवर पडदा टाकण्यात यश मिळवला आहे. गेल्या महिन्याभरापासून राजस्थानमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्य अखेर संपुष्टात आले आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या कारभारावर नाराज होऊन बंडाचा झेंडा उभारणाऱ्या सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यात आली असून, मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायटल यांच्यातील मनभेद दूर झाले नसले तरी सध्यातरी या दोघांचीही गळाभेट घडवून आणण्याची तयारी पक्षश्रेष्ठींनी केली आहे.
सचिन पायलट यांचे राजकीय नाराजी नाट्य जेवढे नाट्यमय होते तेवढ्याच नाट्यमयरीत्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्टींनी या नाराजीवर पडदा टाकण्यात यश मिळवला आहे. या नाट्याच्या अखेरीच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेतेमंडळींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत काँग्रेसमधील संभाव्य फूट टाळली आणि राजस्थानमधील सरकार वाचवले.
सचिन पायलट यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती तेव्हा त्यांच्यासोबत २५ आमदारांचे बळ होते. १२ जुलै रोजी सचिन पायटल यांनी गहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला होता.
सचिन पायलट यांच्या नाराजीचा लाभ राजस्थानमधील गहलोत सरकार पाडण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजपाने उचलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गहलोत सरकार पाडून पायलट भाजपासोबत हातमिळवणी करून मुख्यमंत्री बनणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र याचदरम्यान, पायलट यांचे काही सहकारी पसार होऊन गहलोत यांच्याकडे पोहोचले.
पायलट हे भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. मात्र काँग्रेस सोडण्याबाबत ते अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले नव्हते. आपण भाजपात जात असल्याचे वृत्ताचेही त्यांनी वारंवार खंडन केले.
दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रियंका गांधी यांनी त्यासाठी पायलट यांचे सासरे फारुख अब्दुल्ला आणि मेहुणे उमर अब्दुल्ला यांच्याशी संपर्क साधला. त्याबरोबरच जुन्या संबंधांचा दाखला देत सचिन पायलट यांच्या आई रमा पायलट यांच्याशीही संपर्क साधला गेला.
सचिन पायलट यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीविषयी कुटुंबीयांना कल्पना दिली होती. मात्र त्यादरम्यान, राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षात ते कमकुवत पडू लागले होते.
यादरम्यान, अशोक गहलोत यांनी राजस्थानमधील काँग्रेस आमदारांना एकत्र करत मजबूत मोर्चेबांधणी केली. तर दुसरीकडे सचिन पायलट यांच्याशी चर्चेच्या फेऱ्याही सुरू होत्या. दीपेंद्र हुड्डा यांनी राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधून सचिन पायलट यांची मनधरणी करण्याची जबाबदारी घेतली. भंवर जितेंद्र सिंह यांच्याशीसुद्धा पायलट यांना समजावण्यासाठी संपर्क साधला गेला.
मात्र ही चर्चा सुरू असतानाच अशोक गहलोत यांनी पायलट यांच्यावर जोरदार हल्ला करून बोचरी टीका केली होती. त्यामुळे सचिन पायलट बिथरले होते. मात्र काँग्रेस सोडून थेट भाजपात जाण्यासाठी त्यांची मानसिक तयारी होत नव्हती.
सचिन पायलट आणि काँग्रेसमधील मतभेद तीव्र होत असतानाच कपिल सिब्बल यांनी तबेल्यातून घोडे निघून गेल्यावर काँग्रेसला जाग येणार का असे ट्विट करत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी सिब्बल यांनाच पायलट यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. मात्र यानंतर पायलट यांनी काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधणे बंद केले. या परिस्थितीत गांधी कुटुंबाने चर्चेसाठी कार्ती चिंदबरम यांना पाचारण केले.
कार्ती हे सचिन पायटल यांचे मित्र असल्याने त्यांच्यात चर्चा सुरू झाली. मात्र त्याचवेळी गहलोत यांनी ऑडिओ सीडी प्रसिद्ध करून पुन्हा चर्चेचा मार्ग भरकटवला. यादरम्यान, सचिन पायलट यांचे पारडेसुद्धा कमकुवत पडू लागले होते. त्यामुळे पायलट यांचे समर्थक असलेल्या आमदारांमध्येसुद्धा चलबिचल सुरू झाली होती.
यादरम्यान, गेल्या रविवारी प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा अब्दुल्ला कुटुंबीयांच्या माध्यमातून सचिन पायलट यांच्याशी संपर्क साधला. तसेच सचिन पायलट यांच्यावर कुठलीही टीका करू नये असा सल्ला गहलोत आणि त्यांच्या समर्थकांना दिला.
एकीकडे सचिन पायलट यांची समजूत काढण्यात आली असली तरी अशोक गहलोत ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावेळी तत्कालीन फायदा पाहण्याऐवजी पक्षाने दीर्घकालीन फायदा पाहावा, अशी सूचना पक्षश्रेष्ठींनी केली. दरम्यान, रविवारीच काँग्रेस श्रेष्ठींना भेटून वादावर पडदा टाकण्याचा पायलट यांचा विचार होता. मात्र हा संपूर्ण दिवस राजकीय वाटाघाटींमध्येच गेला.
यादरम्यान प्रियंका गांधी यांनी सचिन पायलट यांना निमंत्रण दिले. त्यानंतर पायलट हे राहुल गांधींच्या भेटीसाठी गेले. तसेच राजस्थानमधील सरकार पाडता येणार नसेल तर विनाकारण वाद घालण्यात काही अर्थ नसल्याचे पायलट यांनी आपल्या समर्थक आमदारांना समजावले. तसेच पक्षात सन्मानजनक स्थान मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी सचिन पायलट यांनी आपली व्यथा मांडली. तुम्ही मला उपमुख्यमंत्री बनवले, पण राजस्थानमध्ये माझी योग्यता आमदारापेक्षापण खालची आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी या नेत्यांमध्ये लहानपणापासून आतापर्यंतची चर्चा झाली.
अखेरीस सचिन पायलट यांच्या मागण्या तत्काळ मान्य केल्या तर पंजाब, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातही नाराजी उफाळून येईल, असे पायलट यांना समजावण्यात आले. तसेच पायलट यांनी थोडी वाट पाहावी, त्यांना पक्षात योग्य स्थान देण्यात येईल. तसेच समर्थकांचाही योग्य मान सन्मान राखला जाईल, असे सांगण्यात आले.
याचदरम्यान, प्रियंका गांधी या सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांना भेटतील, असेही ठरवण्यात आले. मात्र आता गहलोत गटाचे आमदार सचिन पायलट यांना कुठलेही आश्वासन देण्यात आलेने नाही. तसेच ते नाईलाज म्हणून पक्षात आले आहेत, असे सांगू लागले आहेत.
मात्र गेल्या महिनाभरापासून चाललेल्या या राजकीय नाट्यामधून दोन्ही नेत्यांच्या हाती काय लागले आहे हे कुणीच सांगणार नाही. मात्र हे राजकीय नाट्य रोखून काँग्रेसने राजस्थानमधील आपले सरकार वाचवण्यात नक्की यश मिळवले आहे.