फडणवीसांच्या पहाटेच्या सरकारला एक वर्ष पूर्ण, त्या घटनेनं असं बदललं महाराष्ट्राचं राजकारण By बाळकृष्ण परब | Published: November 23, 2020 09:26 AM 2020-11-23T09:26:26+5:30 2020-11-23T09:48:26+5:30
Devendra Fadnavis News : आज २३ नोव्हेंबर २०२०, बरोब्बर वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अभूतपूर्व राजकीय घडामोड घडली होती. राज्यात भाजपाला सत्तेबाहेर ठेवून महाविकास आघाडी आकारास येत असल्याचे निश्चित झाले असतानाच भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे वृत्त धडकले होते. आज २३ नोव्हेंबर २०२०, बरोब्बर वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अभूतपूर्व राजकीय घडामोड घडली होती. राज्यात भाजपाला सत्तेबाहेर ठेवून महाविकास आघाडी आकारास येत असल्याचे निश्चित झाले असतानाच भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे वृत्त धडकले होते. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र शरद पवारांच्या खेळीमुळे हे पहाटेचे सरकार अल्पजीवी ठरले होते. मात्र या घटनेने महाराष्ट्राचे राजकारण बदलले होते. त्याचा घेतलेला हा आढावा.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेच्या महायुतीला मिळून १६१ जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजपा १०५ तर शिवसेना ५६ जागांवर विजयी झाली होती. मात्र शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्याने मोठा राजकीय पेच निर्माण झाला. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचे सांगून शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरला.
शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असली तरी भाजपाकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यातच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार स्थापन होण्याची शक्यता पडताळून पाहिली जाऊ लागली.
राज्यपालांनी सर्व पक्षांना एकेक करून सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देवून चाचपणी केली. मात्र कुणालाही बहुमताचा आकडा दाखवता आला नाही. या सर्व घडामोडींमध्ये विधानसभेची मुदत संपल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. तसेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
दुसरीकडे संजय राऊत यांनी दररोज धडाकेबाज पत्रकार परिषदा घेऊन भाजपाला घायाळ करण्यास सुरुवात केली. अखेरीस अनेक घडामोडी, वाटाघाटी होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी आकारास आली. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
मात्र महाविकास आघाडीचे सरकार येणार म्हणून तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते निश्चिंत झाले असतानाच २२ नोव्हेंबरच्या रात्रीपासून २३ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत अनेक घडामोडी घडून २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. भाजपा आणि अजित पवारांचे समर्थक आमदार यांच्या पाठिंब्याने हे सरकार स्थापन झाल्याचे सांगण्यात आले.
हे वृत्त समोर येताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील असलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले. मात्र या सर्व गदारोळात शरद पवार यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या एकेका आमदाराला आपल्या गोटात आणण्यास सुरुवात केली.
दुसऱ्या दिवशीपर्यंत बहुतांश आमदार पुन्हा पवारांकडे दाखल झाले. अखेरीस या सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. तिथे झालेल्या सुनावणीत फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच फडणवीस यांनी राजीनामा दिला आणि या औटघटकेच्या सरकारची अखेर झाली.
दरम्यान, या पहाटेच्या सरकारमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून गेले. तसेच त्याचे राज्याच्या राजकारणावरही अनेक परिणाम दिसून आले.
देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या या सरकारमुळे एकप्रकारे महाविकास आघाडीला बळकटी मिळाली. भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी अधिक आक्रमकतेने काम केले. त्यात राष्ट्रपती राजवट हटल्याने नवे सरकार स्थापन करण्याचा मार्गही मोकळा झाला.
सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहण्याचा मान मिळवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावे कमी कार्यकाळाचे मुख्यमंत्री होण्याची नामुष्की नोंदवली गेली. तसेच राजकीय तडजोडी करून स्थापन झालेल्या या सरकारमुळे फडणवीस यांच्या प्रतिमेलाही धक्का बसला.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार यांच्यावर जोरदार टीका झाली. मात्र त्यांच्या या निर्णयामागच्या अनेक दंतकथा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जाऊ लागल्या. त्यात अजितदादांचे राजकीय नुकसान झाले नाही. उलट नंतर त्यांनी ठाकरे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदासह वित्त खात्याची जबाबदारी स्वीकारली.
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपासोबतचा घरोबा मोडणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाले. सोबतच शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आली. तसेच उद्धव ठाकरेंच्या रूपात ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती घटनात्मक पदावर विराजमान झाली.
महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या काँग्रेससाठी महाविकास आघाडी सरकार हे संजीवनी देणारे ठरले. सत्तेत आल्याने काँग्रेसच्या खिळखिळ्या झालेल्या संघटनेला बळकटी मिळाली.
मात्र या सर्व गदारोळात शरद पवार यांचे राजकीय कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पवार राजकारणात काहीही करू शकतात, हे गृहितक पक्के झाले. त्याबरोबरच शरद पवार यांच्या खेळीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानही आधीपेक्षा अधिक भक्कम झाले.