माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना ‘आयटम’ शब्द भोवला; निवडणुकीतील ‘स्टार प्रचारक’ पद काढलं
By प्रविण मरगळे | Published: October 31, 2020 09:08 AM2020-10-31T09:08:25+5:302020-10-31T09:11:34+5:30
Madhya Pradesh By Election, EX CM Kamalnath News: वारंवार वादग्रस्त विधानं केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर ही कारवाई केली आहे.
भोपाळ – मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना दणका दिला आहे. एका महिला उमेदवाराबाबत ‘आयटम’ या शब्दाचा वापर केल्यानं निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचे स्टार प्रचारक पद काढून घेतलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर अशाप्रकारे कारवाई झाल्याने पक्षालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
वारंवार वादग्रस्त विधानं केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर ही कारवाई केली आहे. त्यामुळे यापुढे आता कमलनाथ यांच्या सभेचा खर्च उमेदवाराच्या खर्चात जोडला जाईल, त्याचसोबत कमलनाथ यांच्या विमान वाहतुकीचा खर्चही उमेदवाराच्या खर्चात वाढवला जाईल. निवडणुकीत जे कोणी पक्षाचे स्टार प्रचारक असतात त्यांचा खर्च पक्षाच्या खात्यातून केला जातो. त्याचा भार उमेदवाराच्या खर्चात टाकला जात नाही.
काय आहे वाद?
डबरा येथे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार आणि माजी मंत्री इमरती देवी यांच्यावर निशाणा साधला होता. कमलनाथ यांनी काँग्रेस उमेदवार सुरेश राजेच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेतली होती, त्यावेळी इमरती देवी यांच्यावर टीका करताना कमलनाथ म्हणाले होते की, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त तिला ओळखता, तुम्ही मला पहिल्यांदा सावध करायला हवं होतं, ही काय आयटम आहे? अशा शब्दाचा वापर कमलनाथ यांनी केला होता तसेच इमरती देवीला यांना जिलेबी म्हणून संबोधले होते.
कमलनाथ यांच्या वादग्रस्त विधानामुळे भाजपाने काँग्रेसची कोंडी केली. राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्यावर जोरदार प्रहार केला. लोकांनी कमलनाथ यांना धडा शिकवला पाहिजे. एका गरीब आणि मजूर कुटुंबातून पुढे आलेल्या इमरती देवी यांना आयटम आणि जिलेबी म्हणणं अत्यंत निंदनीय आणि आपत्तीजनक आहे. ही कमलनाथ यांची मानसिकता आहे. महिलेसोबतच दलितांचा अपमान करणाऱ्या कमलाथ यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे असं आवाहन ज्योतिरादित्य शिंदे यांनी जनतेला केले.
राहुल गांधींनीही कमलनाथ यांना फटकारलं
कमलनाथ यांनी ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर केला ती आपल्याला अजिबात मान्य नाही. ही घटना दुर्भाग्यपूर्ण आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. राहुल गांधी यांनी खडेबोल सुनावल्यानंतरही कमलनाथ यांनी माफी न मागण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं म्हटलं. "हे राहुल गांधींचं मत आहे" असं म्हणत कमलनाथ यांनी राहुल गांधींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ते वक्तव्य करताना काय संदर्भ होता याचं स्पष्टीकरण मी दिलं आहे. त्यात अजून काही सांगण्याचं कारण नाही. जर माझा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता तर मी माफी का मागावी?, जर कोणाला अपमानित वाटत असेल तर मी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे.असं कमलनाथ यांनी म्हटलं होतं.