राहुल गांधींच्या 'बॅकबेंचर' टीकेवर ज्योतिरादित्य शिंदेंनी लगावला सणसणीत टोला, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 03:58 PM2021-03-09T15:58:01+5:302021-03-09T15:58:47+5:30
Jyotiraditya Scindia lashed out at Rahul Gandhi : ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते. आता भाजपामध्ये जाऊन बॅकबेंचर बनल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेला आता ज्योतिरादित्य यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नवी दिल्ली - ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) हे काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते. आता भाजपामध्ये जाऊन बॅकबेंचर बनल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली होती. या टीकेला आता ज्योतिरादित्य यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी आपली स्वत:ची चिंता करावी माझी चिंता करू नये, असा टोला ज्योतिरादित्य शिंदेंनी लगावला. (Jyotiraditya Scindia lashed out at Rahul Gandhi's 'backbencher' comment)
राहुल गांधी यांनी केलेल्या बॅकबेंचर टीकेला प्रत्युत्तर देताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, मी राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत बोलणे योग्य समजत नाही. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा एक स्तर असतो. गेल्या एक वर्षात मी खूप वर आलो आहे. राहुल गांधी आता माझी जेवढी चिंता करत आहेत. तेवढी चिंता त्यांनी मी काँग्रेसमध्ये असताना केली असती तर ते अधिक उचित ठरले असते, असा टोला त्यांनी लगावला.
It would have been a different situation, had Rahul Gandhi been concerned the same way as he is now, when I was in Congress: BJP MP Jyotiraditya Scindia on Rahul Gandhi's statement that he has become a backbencher in BJP pic.twitter.com/EjlYXEWFxe
— ANI (@ANI) March 9, 2021
यापूर्वी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही राहुल गांधींवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, राहुल गांधींनी हा प्रयोग राजस्थानमध्ये करून पाहिला पाहिजे. त्यांनी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवले पाहिजे. जे दोन वर्षांपासून काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवू शकले नाहीत, ते मुख्यमंत्री बनवण्याच्या बाता आता मारत आहेत. काँग्रेसने संपूर्ण निवडणूक ज्योतिरादित्य शिंदेंच्या नावावर लढवली होती. त्यानंतर सरकार स्थापन करण्याची वेळ आल्यावर कमलनाथ यांचे नाव पुढे केले. ११ दिवसांत कर्जमाफी केली नाही तर मुख्यमंत्री बदलू, असे म्हणाले होते, पण बदलला नाही. अखेर आम्हीच मुख्यमंत्री बदलला.
राहुल गांधींनी ज्योतिरादित्य शिंदेंवर टीका करताना शिंदे यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसह काम करून संघटनेला भक्कम करण्याचा पर्याय होता. एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री बनाल म्हणून मी त्यांना सांगितले होते. मात्र त्यांनी आपली वेगळी वाट निवडली. शिंदे काँग्रेसमध्ये राहून मुख्यमंत्री बनू शकले असते, असा टोला राहुल गांधींनी काल लगावला होता.