राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?; काँग्रेस सरकार अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 09:04 AM2020-07-12T09:04:29+5:302020-07-12T09:06:41+5:30
मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद वाढत चालल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नवी दिल्ली – काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात सामील केल्यानंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळलं. आता भाजपानेराजस्थानकडे आपला मोर्चा वळवला आहे. राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर संकट उभं राहिलं आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपावर सरकार पाडण्याचा आरोप केला आहे. शनिवारी राजस्थानमधील राजकीय हालचालींना जोरदार वेग आला आहे.
मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद वाढत चालल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ज्यावेळी सचिन पायलट दिल्लीत होते त्यावेळी या चर्चांना उधाण आलं. इतकचं नाही तर शनिवारी रात्री राजस्थानमधील २४ आमदार हरियाणातील एका मोठ्या हॉटेलमध्ये पोहचले. मध्य प्रदेशात ज्याप्रकारे शिंदे समर्थक आमदारांना हरियाणा आणि कर्नाटकात एका रिसोर्टमध्ये नेलं होतं तशीच स्थिती राजस्थानमध्ये होताना दिसत आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यंग ब्रिगेडमधील महत्त्वाचे सदस्य सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची एकमेकांसोबत घट्ट मैत्री आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये घडणाऱ्या घडामोडीतून सचिन पायलट हेदेखील भाजपाच्या (BJP) संपर्कात असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाकडून आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाला असता अनेक आमदारांनी फोन स्विचऑफ केल्याचं आढळलं. काँग्रेसचे महासचिव आणि राज्य प्रभारी अविनाश पांडे शनिवारी जयपूरला पोहचले आहेत.
वेगवान राजकीय घडामोडींमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी रात्री उशिरा मंत्र्यांची बैठक बोलावली. (Rajasthan Politics) ज्यात सचिन पायलट आणि समर्थक मंत्री गैरहजर होते, सचिन पायलट हे दिल्लीला असल्याने बैठकीला हजर राहू शकले नाहीत असं सांगण्यात आलं. पण प्रदेशाध्यक्ष असूनही राज्यात सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पद न मिळाल्याने सुरुवातीपासून सचिन पायलट नाराज असल्याचं दिसून आलं होतं.
सरकार स्थिर, पाच वर्षे टिकणार : गेहलोत
पोलिसांनी केलेल्या या कारवाईची माहिती उघड होताच सरकार पाडण्याचे हे कारस्थान भाजपा करत असल्याचा आरोप करणारे पत्रक काँग्रेसच्या २० आमदारांनी जारी केले. त्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी पत्रकार परिषद घेऊन हाच आरोप उघडपणे केला. ते म्हणाले की, कोरोनाची महामारी सुरु असताना सरकार पाडण्याचे हे उद्योग करणे हे भाजपाला माणुसकीची जराही चाड नसल्याचेच द्योतक आहे. परंतु आमचे सरकार भक्कम आहे, ते यापुढेही भक्कम राहील व पूर्ण पाच वर्षे टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया, उपनेते राजेंद्र राठोड व प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सतीश पूनिया त्यांच्या दिल्लीतील नेत्यांच्या इशाऱ्यावरून हे उद्योग करत आहेत, असा थेट आरोप गेहलोत यांनी केला.