भारत जोडो यात्रेत सहभागी होणार? अजित पवार लवकरच भूमिका मांडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 01:54 PM2022-11-13T13:54:57+5:302022-11-13T13:55:13+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते सहभागी होऊ शकले नाहीत
बारामती : राष्ट्रवादीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व काही प्रमुख कार्यकर्ते शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले होते. माझी यासंदर्भातली भूमिका मंगळवारच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले आहे.
बारामती येथे विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा दौरा रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासंदर्भात मंगळवारी (दि. १५) मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मी बोलणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार होते. मात्र मध्यंतरी त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते सहभागी होऊ शकले नाहीत. यापूर्वी देखील अनेक नेत्यांनी अशा पद्धतीने यात्रा काढून आपापल्या पक्षासाठी जनमताचा कौल घेतला आहे. यात्रेबाबत माझी भूमिका मंगळवारच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडणार आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मिळतो. मात्र माझी गृहमंत्री अनिल देशमुख अद्याप जामीन मिळत नाही, याबाबत माध्यमांनी अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ही न्यायालयीन बाब आहे. आणि न्यायालयीन गोष्टींमध्ये बोलणे योग्य होणार नाही. हा न्यायव्यवस्थेचा अधिकार आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही. तर संजय राऊत यांनी मध्यवर्ती निवडणुकीचे वर्तवलेले भाकीत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे.
...ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
राज्यात जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून सुरू आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रातील वडीलधाऱ्या नेत्यांनी कधीही आपल्याला अशा प्रकारची चुकीची वक्तव्य करणे शिकवले नाही. कोणत्याच पक्षाच्या नेत्याकडून तसेच प्रवक्त्याकडून, पक्षप्रमुखांकडून अशा प्रकारची वक्तव्य होऊ नयेत, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.